नवीन पनवेलमधील रहिवाशांचा प्रश्न; मीटरनुसार रिक्षा नसल्याने प्रवाशांची लूट
प्रभाग क्रमांक १७ हा पनवेलमधील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला प्रभाग आहे. उच्चभ्रू वस्त्यांपासून झोपडपट्टीपर्यंत संमिश्र लोकवस्ती येथे आहे. नागरी वस्तीसोबत पोदी गाव आणि त्या गावालगतची वाडीही याच प्रभागामध्ये येते. वाडीतील आदिवासी बांधवांपर्यंत सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी महापालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. वाढत्या कुटुंबाला सामावून घेण्यासाठी करण्यात आलेली वाढीव बांधकामे महापालिका नियमित करणार का, हा येथील रहिवाशांचा प्रमुख प्रश्न आहे.
प्रभाग १७मध्ये सिडको प्रशासनाने बांधलेली बैठी वसाहत आहे. कुटुंबातील व्यक्तींची संख्या वाढली म्हणून त्यांना सामावून घेण्याच्या प्रयत्नात येथे मूळ घरावर मजले चढवण्यात आले आहेत. या घरांना महापालिका नियमित करणार का, हा मुख्य प्रश्न येथील मतदारांना पडला आहे. मूळच्या १२०० घरांची आता ४००० घरे झाली आहेत. त्यामुळे तेथील पायाभूत सुविधांवरचा वाढलेला ताण, त्यामुळे निर्माण झालेले सुरक्षा आणि आरोग्याचे प्रश्न पालिकेचे प्रशासन व लोकप्रतिनिधी सोडवू शकतील का, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे.
पनवेल रेल्वे स्थानक (पूर्व) येथून नवीन पनवेलमध्ये चालत येण्यासाठी प्रशासनाने स्कायवॉक बांधावा, अशी मागणी होत आहे. या परिसरातील तीन आसनी रिक्षा मीटरप्रमाणे भाडे आकारत नसल्यामुळे प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मर्जीप्रमाणे भाडे द्यावे लागते. महापालिकेच्या काळात तरी रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप बसावा, अशी येथील रहिवाशांची अपेक्षा आहे. पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी नेरे, विचुंबे व सुकापूर तसेच नवीन पनवेल वसाहतीमधील अनेकजण दुचाकी घेऊन येतात. त्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात उभ्या करून पुढील प्रवासासाठी निघून जातात. त्यामुळे रस्त्याला वाहनतळाचे रूप आले आहे. वाहतूक पोलीस अधूनमधून कारवाई करतात आणि कारवाई थंडावताच पुन्हा स्थिती जैसे थे होते. खारघर रेल्वे स्थानकाप्रमाणे पनवेल रेल्वे स्थानकावरही सुमारे तीन हजार दुचाकी व पाचशे चारचाकी वाहने उभी करण्याची सोय प्रशासनाने केल्यास हा प्रश्न सुटू शकेल, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
नवीन पनवेल परिसरात मोठय़ा प्रमाणात गलिच्छ वस्ती आहे. येथील महिला व मुलांचे पोट हातावर आहे. त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे असून त्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत या परिसरातील रहिवासी साईराज कांबळे यांनी व्यक्त केले.
उद्यानात कोंबडी विक्रेते, फेरीवाले
सिडको प्रशासनाने नियोजनबद्ध शहराची निर्मिती करताना नवीन पनवेल परिसरात बाजारपेठ व उद्याने विकसित केली. मात्र सध्या या उद्यानांचे कोपरे देवळांनी व्यापलेले दिसतात. तिथेच कोंबडी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. कोंबडीवाल्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून हातगाडय़ांनीही उद्यानात शिरकाव केला आहे. सिडको प्रशासनाच्या नवीन पनवेल येथील समाजमंदिराच्या शेजारील उद्यानाची ही अवस्था आहे. येथील क चरा वेळेवर उचलला जात नाही, त्यामुळे येथे येणाऱ्यांना नाकाला रुमाल लावूनच फेरफटका मारावा लागतो. उद्यानाशेजारी कचऱ्याचे ढिगारे हीच नवीन पनवेलची ओळख बनली आहे.
प्रभाग क्षेत्र –
शिवा कॉम्प्लेक्स, सेक्टर १४, पंचशीलनगर झोपडपट्टीसह, पोदी गाव, गावालगतची वाडी
कचऱ्याचा खड्डा
नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिराशेजारील एक रस्ता खचला आहे. सिडको अधिकाऱ्यांना याबाबत येथील रहिवाशांनी निवेदने दिली आहेत, मात्र त्यावर कारवाई शून्य झाली आहे. याच खड्डय़ाला सिडकोने कचराकुंडी बनवली आहे. हा खड्डा आता कचऱ्याचा खड्डा म्हणून ओळखला जातो. वसाहत हस्तांतर प्रक्रिया सुरू असल्याने हा खड्डा सिडको प्रशासन कधी दुरुस्त करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.