शेकाप आघाडीला तोंड देण्यासाठी एकत्र येण्याचे प्रयत्न
पनवेल पालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असले, तरीही तीन राजकीय पक्षांच्या एकजुटीला तोंड देण्याच्या दृष्टीने शिवसेनेची मदत मिळवण्याची भाजपची धडपड सुरूच असल्याचे पुढे आले आहे. भाजपने शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला असून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे शिष्टमंडळ गुरुवारी मुंबईत गीते यांना भेटल्याची चर्चा पनवेलमध्ये होती. शिवसेना पक्षप्रमुखांनी सन्मानजनक प्रस्ताव असल्यास युती करण्याचे संकेत केंद्रीय मंत्री गीते यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
अनेक शिवसैनिकांना युती झाल्यास निवडून येण्याची स्वप्ने पाहिली असून सर्व जागांसाठी इच्छुकांचे अर्ज आले असले तरी प्रत्येक प्रभागामध्ये सेनेचे उमेदवार येतील याची खात्री खुद्द सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नसल्याने अनेकांनी पक्षप्रमुखांसमोर मागील आठवडय़ातील बैठकीत युतीचा प्रस्ताव ठेवला होता. याच बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी रामशेठ ठाकूर यांचा करिश्मा पनवेलमध्ये चालतो, तर ४० वर्षांची परंपरा असलेल्या शिवसेनेची नेमकी ताकद किती हे पाहण्यासाठी ही निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी करा, असे फर्मान सोडले. भाजपने युतीचा प्रस्ताव दिल्यामुळे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमावेळी ठाकरे यांना युतीसाठी भाजप उत्सुक असल्याचे सांगितले, असे वृत्त आहे.
भारतीय जनता पक्ष केंद्रात व राज्यात शिवसेनेसोबत युतीत असल्याने पनवेल पालिका निवडणुकीतही युती करण्यासाठी उत्सुक आहोत. मात्र अधिकृत कोणतीही बोलणी अद्याप सुरू झालेली नाहीत. तीन राजकीय पक्ष एकत्र येऊन लढत असल्यास समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास त्यात वावगे काहीही नाही, असे मला वाटते. अद्याप केंद्रीय मंत्री अनंत गीते किंवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत युतीसंदर्भात कोणतीही बैठक झाली नाही.
– प्रशांत ठाकूर, आमदार भाजप
भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेशी युती करण्याचा प्रस्ताव यापूर्वीही सेनेकडे आला होता. भाजपच्या नेत्यांकडून आजही युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्वबळाचा विचार पालिका निवडणुकीपूर्वीपासून पनवेलच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडला आहे. रायगड जिल्ह्य़ातील दोन खासदार व आमदारांना भाजपच्या गोटातून पुन्हा युतीचा प्रस्ताव आला आहे हे खरे आहे. मात्र त्यावर अजूनही ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
– आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख शिवसेना