पनवेल पनवेल महापालिकेच्या स्थापनेला आठ वर्षे पुर्ण झाल्यानंतर सिडको वसाहतींमधील कामोठे येथे दोन ठिकाणी आणि तळोजात एका ठिकाणी पालिका प्रशासन प्राथमिक शाळा उभारणार आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील पालकांकडून पालिकेच्या शाळा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. पुढील दोन वर्षांत या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू करण्याचे नियोजन पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी आखले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल महापालिकेची वार्षिक उलाढाल सुमारे चार हजार कोटी रुपयांची आहे. पालिका सामान्यांकडून शिक्षण कर आकारते. मात्र सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्यांना अद्याप पालिका शिक्षण देत नाही. पालकांना पदरमोड करुन खासगी शाळेत शिकवावे लागते. छोटाशिशू, बालवाडी ते सातवी इयत्तेपर्यंत २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी पालिकेने शिक्षण धोरण बनविण्याचे काम पूर्ण केले आहे. सध्या पनवेल महापालिकेच्या स्वमालकीच्या शाळा फक्त पनवेल शहरातच आहेत. फक्त पनवेल शहरातील या शाळांमध्ये हजारांवर पालिकेचा पट गेला नाही.

तळोजा, कळंबोली, कामोठे, खारघर, नावडे या वसाहतींमध्ये आणि २९ गावांमध्ये पालिकेच्या स्वताच्या शाळा नाहीत. हे विद्यार्थी रायगड जिल्हापरिषदेच्या शाळांवर अवलंबून आहेत. जिल्हापरिषदेच्या ५१ शाळांचे अजूनही हस्तांतरण पालिकेकडे न झाल्याने पालिकेने स्वत:च्या शाळा बांधण्याचे धोऱण आखले आहे. आयुक्तांच्या पाठपुराव्यामध्ये त्यांना तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांची महत्वाची साथ मिळाली आहे.

देशमुख हे सिडको मंडळाचे विद्यमान सह व्यवस्थापकीय संचालक आहेत. सिडको मंडळाकडून पनवेल पालिकेला मिळणारे भूखंड हस्तांतरणाचे काम देशमुख यांच्यामुळे जोरदार सुरू आहे. याच प्राप्त भूखंडावर तळोजा फेस १ मधील सेक्टर ७ तसेच कामोठे वसाहतीमध्ये शाळेच्या इमारती बांधण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.

एक एकरात शाळा आणि मैदान सोमवारी पालिकेच्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत या शाळांचे कामकाज सुरू करण्याची सूचना आयुक्त चितळे यांनी शहर अभियंता संजय कटेकर यांना केली. या शाळेच्या इमारती सुमारे एक एकर जागेवर उभारल्या जाणार असून शाळेला मैदान सुद्धा उपलब्ध होणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation administration to build primary schools in kamothe and taloja zws