पनवेल : पनवेल महानगरपालिका प्रशासनाने अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर शहरातील बेकायदा हातगाड्यांवर तोडक कारवाईला मंगळवारपासून सूरुवात केली आहे. बुधवारीसुद्धा पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाईचे सत्र सूरुच होते. बेकायदा हातगाड्यांवर तसेच अनधिकृत्या बांधलेल्या झोपड्या, दुकानांबाहेर अनधिकृतरित्या ठेवलेल्या सामानांवर ही कारवाई करण्यात आली. पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशांनूसार ही अतिक्रमणविरोधी कारवाई होत आहे.
पदपथावर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होण्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच शहरातील हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळे होत आहे. मंगळवारी कळंबोली वसाहतीमध्ये १२ हातगाड्यांवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच पनवेल शहरातील उरण नाका येथील ७ हातगाड्या जप्त करून त्या तोडण्यात आल्या.
हेही वाचा >>>करंजातून निर्यात होणाऱ्या शेवंड आणि खेकड्यांची दरवाढ, शेवंड २ हजार तर खेकडा २ हजार ६०० रुपये किलो
पालिका आयुक्त चितळे यांनी अतिक्रमणावर कडक कारवाई करण्याचे आदेश चारही प्रभाग कार्यालयातील प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवारी खारघरमधील सेक्टर १२ येथे अनधिकृतरित्या वसवलेल्या झोपडपट्टीवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच पनवेल शहरामध्ये लाईन आळीमधील दुकानदारांनी दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. कामोठे मध्ये पदपथावर दुकानदारांनी ठेवले दुकानाचे बोर्ड काढून नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करुन देण्यात आले. कळंबोलीमध्ये पदपथावर अनधिकृतरित्या उभारलेले सरबताचे स्टॉल्स तसेच अन्य स्टॉल्सवर तोडक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>>प्रवासी नसलेल्या बस थांब्यासाठी वळसा, एनएमएमटीच्या नाहक मार्गबदलाने वेळेचा अपव्यय
खांदेश्वर वसाहतीमध्ये अजूनही सायंकाळनंतर पेट्रोलपंपाच्या जवळील फेरीवाला क्षेत्रातील पदपथ मोकळे करावे तसेच त्याच परिसरताली इंद्रआंगण सोसायटीसमोरील आसूडगावकडे जाणारा पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील रस्त्यांवर तसेच फूटपाथवर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. फेरीवाल्यांनी रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करू नये अन्यथा येत्या दिवसांमध्ये अतिक्रमणांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात येईल.- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका