पनवेल: हिवाळा ऋतूमधील पनवेलचे वाढते वायू प्रदूषण ध्यानात घेता पनवेल महापालिकेने श्वसनदाह रुग्णांना मुखपट्टी लावण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने मुखपट्टी पाळण्याची सूचना पाच वेगवेगळ्या घटकांना केली आहे. यामध्ये पाच वर्षांखालील मुले, वृद्धपकाळातील व्यक्ती, गरोदर माता, श्वसन व हदयाचे दुर्धर आजार असलेली व्यक्ती, तसेच ज्या व्यक्तींची पोषणस्थिती खराब आहे आणि स्वयंपाक, उष्णता आणि प्रकाशासाठी जीवाश्म इंधनाचा वापर करणाऱ्या व्यक्तींसोबत वाहतूक पोलिस, वाहतूक स्वयंसेवक, बांधकाम कामगार, रस्ते सफाई कामगार आदी व्यक्तींनी मुखपट्टी घालण्याचे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक वायू प्रदूषण हे तळोजा वसाहतीमध्ये असल्याची ओरड येथील रहिवाशांकडून होत आहे. या परिसरात राहणारे राजीव सिन्हा यांनी लोकायुक्तांकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या परिसरात एकही आरोग्यवर्धिनी केंद्र नसल्याने येथील रहिवाशांपैकी किती जणांना श्वसनदाहाचे आजार आहेत याची संख्या पालिकेकडे उपलब्ध नाही. मुंबईत धुलीकण हवेत वाढल्याने प्रदूषणावर मात्रा म्हणून मुंबई पालिका रस्त्यांवर पाणी मारुन धुलीकण कमी कऱण्याचे काम सूरु आहे. पनवेलमध्ये मुंबईपेक्षा मोठ्या प्रमाणात तळोजा व इतर परिसरात बांधकामे सूरु आहेत. या बांधकामांमधून निघणारे धुलीकण, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामातून निर्माण होणारे धुलीकण, पनवेलमध्ये ८० दगड उत्खनन करणा-या खदाणी आहेत. या खदाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानूसार सूरु आहेत का असा प्रश्न आहे. पनवेल व तळोजा परिसरातील बांधकामांभोवती धुलीकण थेट हवेत जाऊ नये यासाठी हिरवे पडदे लावले आहेत का, खदाणीतून निघणा-या धुळीसाठी कोणत्याही  उपाययोजना होताना दिसत नाहीत. पनवेलमधील लोकप्रतिनिधींची भागीदारी बांधकाम व्यवसाय आणि खदाणींमध्ये असल्याने या व्यवसायाविरोधात कोणताही राजकीय पक्ष बोलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आनंद गोसावी यांनी या वायूप्रदूषणामुळे रिक्षाचालक, तसेच रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे विक्रेते आणि प्रदूषित वातावरणात घराबाहेर काम करणारे इतर नागरिकांना या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे. स्वयंपाकासाठी बायोमास (गोवऱ्या/ लाकूड) जाळणाऱ्या स्त्रिया घरातील कामामुळे असुरक्षित असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

हेही वाचा >>>फुटबॉल सामना पाहण्यास नवी मुंबईत येताय? वाहतूक बदल वाचा 

नागरिकांनी काय करावे

संथ आणि रहदारी असलेले रस्ते, प्रदूषण कारी उद्योगांजवळील क्षेत्रे, बांधकाम पाडण्याची ठिकाणे, कोळशावर आधारित अशी उच्च प्रदूषण असलेली ठिकाणे, टाळा वीज प्रकल्प व वीटभट्टी इत्यादी ठिकाणी जाणे टाळा.

एक्यूआय पातळीनुसार बाहेरील कामांचे वेळापत्रक तयार करा आणि खराब ते गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसांमध्ये घरातच रहा.

खराब ते गंभीर एक्यूआय असलेल्या दिवसांमध्ये, सकाळी आणि संध्याकाळी उशिरा चालणे, धावणे, जॉगिंग आणि शारीरिक व्यायाम टाळा.

सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत खिडक्या आणि दरवाजे उघडू नका, गरज पडल्यास दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत बाहेर पडू शकता.

लाकूड, कोळसा, जनावरांचे शेण, रॉकेल यांसारखे बायोमास जाळणे टाळावे.

स्वयंपाक आणि उष्णतेच्या उद्देशाने स्वच्छ धूररहित इंधन (गॅस किंवा वीज) वापरा. बायोमास वापरत असल्यास, स्वच्छ कुक स्टोव्ह वापरा.

फटाके जाळणे टाळा.

कोणत्याही प्रकारचे लाकूड, पाने, पिकांचे अवशेष आणि कचरा उघड्यावर जाळणे टाळा.

सिगारेट, बीडी आणि संबंधित तंबाखूजन्य पदार्थ सेवन नका.

बंद आवारात डासांच्या कॉईल आणि अगरबत्ती जाळणे टाळावे.

घरांमध्ये झाडू मारण्याऐवजी किंवा व्हॅक्यूम साफ करण्याऐवजी ओल्या कपड्याचावापर करा. आपण व्हॅक्यूम क्लीनर वापरणे निवडल्यास, ज्यात उच्च कार्यक्षमता पार्टिकुलेट एअर (एचईपीए) फिल्टर आहे ते वापरा.

नियमितपणे वाहत्या पाण्याने डोळे धुत रहा आणि कोमट पाण्याने नियमित पणे गुळण्या करा.

श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना, डोळ्यांमध्ये जळजळ (लाल किंवा पाणी) असल्यास जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निरोगी आहार, ताजी फळे आणि भाज्या खा

पाणी पिऊन पुरेशा प्रमाणात शरीरामधील पाण्याची पातळी राहील याची काळजी घ्या

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation appeals to residents to wear masks due to increasing air pollution amy