पनवेल  पनवेल महापालिकेत नूकत्याच (शुक्रवारी) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहर आणि उपनगरांमध्ये रस्ते बांधणी आणि कळंबोली येथील धारणतलावातील गाळ काढणे या धारणतलावामध्ये पंपहाऊस नव्याने कार्यान्वित करणे, धारण तलावाचे सुशोभिकरण करणे अशा विविध कामांसाठी ४२१ कोटी रुपयांच्या ठरावांना मंजूरी दिली आहे. यामधील अनेक विकासकामे सिडको वसाहतींमध्ये होत असून सिडको मंडळाने बांधलेल्या मुख्य रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण महापालिका प्रशासन करत आहे. यामुळे खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल यांसारख्या उपनगरांमध्ये कॉंक्रीटचे रस्ते बांधणीचा श्रीगणेशा महापालिकेने केल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> स्वातंत्र्य संग्रामात झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

पनवेल महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकांच्या हाती आहे. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन पालिकेची सर्वसाधारण सभेतून नागरिकांच्या हिताचे महत्वाचे निर्णय घेत आहेत. खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर, तळोजा, नावडे या विविध वसाहतींचे निर्माण सिडको महामंडळाने केले असून यांतील अनेक वसाहतीं ३० वर्षांपुर्वी उभारल्या गेल्या आहेत. सिडको मंडळाने मागील अनेक वर्षे या वसाहतींमध्ये कॉ़ंक्रीटचे रस्ते बांधले नव्हते. महापालिकेने वाढते नागरीकरण, वाहनांचा ताण ध्यानात घेऊन भविष्यात खड्डे समस्या पुढील काही वर्षांसाठी तरी मोडीत काढण्यासाठी रस्ते कॉंक्रीटचे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल असे आश्वास पनवेल महापालिका आयुक्त देशमुख यांनी लोकसत्ता ‘शहरभान’ या कार्यक्रमात नागरिकांना दिले होते. दिड आठवडा उलटताच याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिका परिसरातील उपनगरांमध्ये कॉंक्रीट व डांबरी रस्ते बांधण्यासोबत कळंबोली येथील धारण तलावातील गाळ काढून तिथे पंपहाऊस कार्यान्वित करण्याचा निर्णय आयुक्त देशमुख यांनी घेतला. सर्वसाधारण सभेतील मंजूरीनंतर निविदा प्रक्रीयेपूर्वी तांत्रिक मंजूरी मिळविण्याची प्रक्रीया पनवेल महापालिकेत सूरु झाली आहे. येत्या दोन आर्थिक वर्षात सिडको वसाहतींचे मुख्य रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण महापालिका करणार आहे.

हेही वाचा >>> …तर माथाडी विधानभवनावर धडकणार, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा इशारा

सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळालेल्या कामांची माहिती

– खारघर उपनगरासाठी १०६ कोटी ८२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये लीटीलवर्ल्ड मॉल ते उत्सव चौक संपुर्ण रस्ता कॉंक्रीटीकरण, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल. पदपथांचे नूतनीकरण, पदपथ व रस्त्यांची दुरुस्ती, बेलपाडा अंडरपास ते नॅशनल फॅशन टेक्नोलॉजी महाविद्यालय पावसाळी गटार, रस्ते बांधणे, प्रस्तावित बेलपाडा मेट्रो स्थानक ते गणेश मंदीर ते उत्सव चौक या रस्त्याचे कॉंक्रीटीकरणसाठी २३ कोटी ३५ लाख रुपये

– कळंबोली उपनगरामध्ये शीव पनवेल महामार्गावरील सेक्टर १ येथील शिवसेना शाखा ते रोडपाली येथील अविदा हॉटेलपर्यंतचा संपुर्ण रस्ता कॉंक्रीटीकरण, करावली चौक ते अग्निशमन दल इथपर्यंत कॉंक्रीटीकऱण, ८० कोटी ८८ लाख रुपये, तसेच केएलई महाविद्यालय (कामोठे बसथांबा) ते रोडपाली तलाव या रस्त्याचे डांबरीकरण १९ कोटी ९६ लाख रुपये.

– कळंबोली उपनगरातील एलआयजी बैठ्या वसाहतीलगत धारणतलावातील गाळ काढणे, या तलावाजवळ पंपहाऊस उभारुन तो कार्यान्वित करणे यासाठी ११६ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यानंतर या तलावाचे सुशोभिकरण करण्याचे काम पालिका हाती घेणार आहे. तलावाचे काम कऱणा-या संबंधित एजन्सीने काम करण्याअगोदर पर्यावरण विषयक मंजू-या विविध सरकारी कार्यालयातून मिळविणे त्या एजन्सीची जबाबदारी असणार आहे. कांदळवन समिती व इतर पर्यावरण विषयक मंजू-या आतापर्यंत सिडको मंडळाला मिळविता न आल्याने हे काम मागील १५ वर्षांपासून रखडले होते. 

– नवीन पनवेल उपनगरांतील एचडीएफसी सर्कल आणि आदई सर्कल या दोन्ही सर्कलचे कॉंक्रीटीकरणासाठी ६ कोटी ५० लाख

– पनवेल शहरातील महापालिकेचे नवीन स्वराज्य पालिका मुख्यालयासमोरील मार्ग ते जेएनपीटी मार्गाला जोडणा-या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणासाठी ४६ कोटी ४३ लाख रुपये पालिका खर्च करणार आहे. – पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्ग (न्यायाधीस निवास ठाणा नाका) ते मित्रानंद सोसायटी कॉंक्रीटीकरण करण्यासाठी ९ कोटी ४६ लाख रुपये

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation approved funds for concrete road construction in agm zws