पनवेल शहर महापालिकेने मागील वर्षी हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे वर्षाच्या शेवटी पनवेल महापालिका क्षेत्रात साडेतीनशे बांधकामे सुरू असूनही हवेतील धूलिकणांमुळे गुणवत्ता निर्देशांकाचे प्रमाण वाढले नाही, असा दावा पनवेल महापालिकेने केला आहे. पालिकेने उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने १६४ बांधकाम व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्यासाठी नोटिशीद्वारे सूचना दिल्या. पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभाग स्तरावर निरीक्षण व कारवाईसाठी विशेष समित्या स्थापन करुन सहाय्यक आयुक्तांना बांधकाम थांबविण्याचा व त्वरित कारवाई करण्याचा अधिकार दिल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याशिवाय स्वच्छतेसाठी विविध यांत्रिकी उपाययोजना केल्याचा लाभ पनवेलमध्ये होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेने चार फॉग कॅनन वाहने तैनात केली असून त्या माध्यमातून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी पाण्याचा फवारा केला जातो. या वाहनांनी दररोज २४० कि.मी. क्षेत्राचा परिसराची स्वच्छता केली जाते. तसेच रस्त्यांची स्वच्छता व पाण्याच्या फवारणीसाठी धूल प्रतिबंधक वाहनांचा वापर केला जातो. दिवाळीपूर्वी ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ सुरू करण्यात आले असून यासाठी शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पनवेल पालिकेचे उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांनी दिली.

हे ही वाचा… खाद्यतेलाच्या दरात ३० टक्के वाढ; निर्यात शुल्क, सोयाबीन दरात वाढ झाल्याचा परिणाम

हे ही वाचा… आता संचलन परवान्याची प्रक्रिया, विमान संचलनासाठीचा परवाना अर्ज लवकरच नागरी हवाई वाहतूक विभागाकडे

हवा गुणवत्ता मोजण्यासाठी फिरते निरीक्षण केंद्रे आणि दोन एअर पोल्युशन मॉनिटरिंग स्टेशन कार्यरत आहेत. या वर्षी सात नवीन स्टेशन आणि पाच हवामान मापन केंद्रे बसविण्याचे पालिकेचे नियोजन आहे. या प्रयत्नांमुळे यंदा पनवेलच्या हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) बहुतेकदा १५० पेक्षा खाली राहिला आहे. गेल्या वर्षी एक्यूआय २०० पेक्षा जास्त गेला होता, परंतु यंदा नियंत्रणात असल्याचे आकडेवारी दर्शवते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि एकूण हवेची गुणवत्ता पाहता महानगरपालिका हवेतील धूलिकणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी केलेल्या उपाययोजनांमुळे हवेतील गुणवत्ता निर्देशांकात सकारात्मक बदल दिसत आहे. – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation claims that air pollution is under control in city asj