पनवेल : पनवेल महापालिकेचे काम करताना स्वतः आणि सहकारी कर्मचाऱ्याचे रिल्स बनवून ते रिल्स समाजमाध्यमांवर प्रसिद्धी करणे पनवेल महापालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. महापालिका आयुक्तांनी कामाच्या वेळेस केलेल्या उपद्रवाबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिल्याने या कर्मचाऱ्यांना घरी बसण्याची वेळ आली. उपद्रवी कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचा-यांचा समावेश आहे. पालिकेने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने पालिकेच्या उपायुक्तांनी त्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेला सात वर्षे पुर्ण झाली. पालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचारी वर्ग वगळता कंत्राटी कामगार पालिकेकडे पाचशेहून अधिक काम करतात. अजूनही आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर लेखी परिक्षा राज्यभरात झाली पण अद्याप कंत्राटी कामगारांच्या जिवावर पालिकेचा कामाचा गाडा सूरु आहे. मात्र याच कर्मचाऱ्यांपैकी काहींनी कामाच्या वेळेमध्ये स्वतःचे चलचित्र बनवून त्यावर कामाचा ताण असलेली गाणी वाजवून रिल्स बनविल्या आहेत. यामधील काही रिल्स हे वर्षापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. मात्र पालिका प्रशासनाचे हे सर्व उपद्रव ध्यानात आल्यावर ठेकेदार कंपनीला तातडीने कामावरुन कमी करा अशी शिफारस पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांनी केली.
हेही वाचा…नवी मुंबई महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील इंटरनेट सेवा ठप्प
यापूर्वीही पालिकेमध्ये वाढदिवस सोहळा साजरा केल्याने पालिकेने कार्यालयीन आदेश काढून वाढदिवस साजरे करणे शिस्तभंगाचे ठरेल असे सुनावले होते. पनवेल महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेक उपक्रम राबविले आहे. मात्र या कर्मचा-यांनी बनविलेल्या रिल्सची चर्चा शहरभर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली. एकापाठोपाठ एक रिल्स प्रसिद्ध झाल्यामुळे पालिकेने कंत्राटी कामगारांवर अंकुश ठेवण्यासाठी सक्तीचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
‘चुकीला माफी नाही’ हे सूत्र अनैसर्गिक
संबंधित कर्मचारी हे कंत्राटी असल्याने या प्रकरणात नैसर्गिक न्याय पद्धतीचा अवलंब न करता तडकाफडकी निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या प्रकरणातील काही कर्मचारी वगळता इतरांचे संसार या कंत्राटी कामावर होते. या कर्मचाऱ्यांनी हे कृत्य करणे अपेक्षित नव्हतेच. मात्र इतरांना धडा शिकविताना या कंत्राटी कर्मचाऱ्यांची पहिलीच चूक असल्याने त्यांना एक नैसर्गिक संधी म्हणून काही महिन्यांसाठी कंत्राटदाराने निलंबीत केल्यास ते संयुक्तिक ठरले असते. चुकीला माफी नाही हे सूत्र पालिकेचे टोकाचे पाऊल याचीच दिवसभर पालिकेत चर्चा सूरु होती.