सव्वाचार लाखांपैकी तब्बल साडेतीन लाख मतदार शहरांत
पनवेल महापालिकेवर सत्ता कोणत्या राजकीय पक्षाची असेल हे स्पष्ट होण्यासाठी २६ मेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असली तरीही येथील सत्तेची सूत्रे शहरी मतदारांच्याच हाती असतील, हे निश्चित आहे. महापालिकेमधील सव्वा चार लाख मतदारांपैकी तब्बल तीन लाख ४७ हजार मतदार हे शहरी भागातील आहेत. त्यामुळे सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांना या शहरी मतदारांना खूश करणे क्रमप्राप्त आहे.
१४ हजार ५४ मतदारांच्या प्रभाग १ मध्ये तळोजा ते धानसर, करवले, घोट, कोयनावेळे, रोहिंजण, पेणधर या गावांची लोकसंख्या २६ हजार २३७ आहे. हा प्रभाग पूर्णपणे ग्रामीण मतदारांचा आहे. येथील ग्रामपंचायतींवर यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव होता. २५ हजार ८४७ लोकसंख्या आणि १३ हजार ९२० मतदार असलेल्या प्रभाग २ मध्ये नावडे गावजवळील वसाहतीमधील ८०० मतदार वगळता बाकी शहरी मतदार आहेत. नावडे गाव व झोपडपट्टीत ३ हजार ७०० मतदार आहेत. पडघे, देवीचापाडा, तोंडरे, पाले खुर्द, नागझरी गावांतील मतदारांची संख्या १३ हजारांवर आहे. या प्रभागामध्येसुद्धा शेकापचा वरचष्मा होता. २४ हजार ६४ लोकसंख्या तसेच २३ हजार ४०६ मतदारांच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये शहरी मतदार ११ हजारांपर्यंत आहेत. यातील २ हजार ९०० मते तळोजा फेज १ मध्ये तर तब्बल आठ हजार मते खारघर सेक्टर ३०, ३४ ते ३६ मधील आहेत. पेठार्ली गाव व भोईरपाडा येथे एक हजार, ओवेगाव, रांजणपाडा, ओवेकॅम्प येथे साडेचार हजार मते शहरी मतदारांची आहेत. याच प्रभागामध्ये तळोजा गाव व पापडीचा पाडा येथे सात हजार मतदार आहेत. याच प्रभागामध्ये निम्मे मतदार शहरी आहेत. ४ ते ६ या तीनही प्रभागांमध्ये खारघर वसाहतींसोबत कोपरा, खारघर, मुरबी, बेलपाडा अशी गावे आहेत. सुमारे ८० हजार ६०० लोकसंख्येच्या या परिसरात ८० हजार २०० मतदारांची नोंद सरकार दरबारी झाली आहे. यामधील साडेपाच हजार मतदार कोपरा, खारघर, बेलपाडा व मुरबी या गावांमधील आहेत. उर्वरित ७५ हजार शहरी मतदारांचा समावेश प्रभागामध्ये आहे.
कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक ११, १२ व १३ची लोकसंख्या ६९ हजार ६६६ आहे. तसेच ६० हजार ५५० मतदारांपैकी नौपाडा गाव, जुई व कामोठे गावातील मतदारसंख्या पाच हजारांवर आहे. त्यामुळे येथे ५५ हजार शहरी मतदारांच्या हाती कौल असणार आहे.
प्रभाग क्रमांक १४ची लोकसंख्या २८ हजार ३०८ असून यामध्ये २४ हजार ४८८ मतदार आहेत. चार हजार मतदार लहान व मोठा खांदा गावातील असून उर्वरित २० हजार मतदार खांदेश्वर वसाहत आणि पनवेलच्या साईनगर, पटेल मोहल्लापर्यंतच्या शहरी परिसरातील आहेत. प्रभाग क्रमांक १४, १५, १६ व १७मध्ये सुमारे ९० हजार ४७४ शहरी मतदार आहेत. पनवेल रेल्वेस्थानकासमोरील पश्चिमेचा परिसर काही प्रमाणात या प्रभागांमध्ये आहे. यानंतर प्रभाग क्रमांक १८, १९ व २० मध्ये पोदी, तक्का व काळुंद्रे ही गावे असून त्यामध्ये साडेसहा हजार मतदार ग्रामीण आहेत. तर याच तीन प्रभागांमध्ये ६० हजार मतदार शहरी आहेत.
कळंबोलीत ५५ हजार शहरी मतदार
अशीच परिस्थिती कळंबोली परिसरामध्ये आहे. प्रभाग ७, ८, ९, दहा मध्ये ७५ हजार ८२४ लोकसंख्या नोंदवली गेली आहे. या प्रभागामध्ये ५५ हजार ८४७ मतदार कळंबोली शहरातील असून उर्वरित ६ हजार ४०० मतदार कळंबोली व रोडपाली गावातील आहेत. प्रभाग नऊमध्ये १९ हजार मतदारांपैकी ९ हजार कळंबोलीमधील, तर उर्वरित १० हजार मतदारांपैकी खिडुकपाडा, आसूडगाव, वळवली, टेंभोडे गावांसोबत नवीन पनवेल परिसरातील सुमारे अडीच हजार मतदारांचा समावेश आहे.