सुट्टीनिमित्त गावी गेलेल्यांना शोधण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर
शाळेच्या सुट्टीत गावी गेलेल्या मतदारांमुळे मतदानाचा टक्का कमी होऊ नये, म्हणून निवडणूक आयोगाने विविध स्तरांवर जनजागृती मोहीम हाती घेतली असताना राजकीय पक्षही आपापल्या मतदारांना हजर करण्यासाठी कामाला लागले आहेत. मतदारांच्या गावी जाऊन त्यांचा शोध घेण्यासाठी पक्षांनी कार्यकर्त्यांची पथकेच तयार केली आहेत. त्यांचा ‘रोज’ ठरला असून, वाहनाची आणि जेवणाची सोय करण्यात उमेदवार गुंतले आहेत. सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्य़ांत पथके धाडली जाणार आहेत. सुमारे २० टक्के मतदार पालिका क्षेत्राबाहेर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील अनेक मतदार सुट्टीनिमीत्त गावी गेले आहेत. कळंबोली, कामोठे व खांदेश्वर वसाहतीतील अनेक प्रभागांतील मतदार मोठय़ा प्रमाणात गावीच स्थलांतरित झाले आहेत. महापालिकेच्या मतदारयादीतील पत्त्यांवर ते राहतच नाहीत, असे अनेक उमेदवारांच्या निदर्शनास आले आहे. अशा मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे या मतदारांची शोध मोहीम उमेदवारांनी हाती घेतली आहे.
अशा मतदारांना परत आणण्यासाठी उमेदवारांनी आपल्या मर्जीतील काही खास व्यक्ती या शोधमोहिमेवर पाठविली आहेत. त्यांच्या दिमतीला आलिशान गाडय़ाही देण्यात आल्या आहेत. आटपाडी, दहीवडी, खंडाळा, लातूर, मराठवाडा, बीड, अहमदनगर, सांगोला, उदगीर, परभणी या भागांत या शोधमोहिमा सुरू आहेत. हे मतदार नेमके कोणत्या गावात राहतात हे शोधणे जिकिरीचे आहे. प्रत्येक गावातील चावडीवर जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ नावाच्या आधारे, त्याचा शोध घेतला जात आहे. गावातील जुन्या-जाणत्या व्यक्तींकडून माहिती घेतली जात आहे.
पहिल्या महापालिकेत नगरसेवक होण्यास इच्छुक असणाऱ्यांची भाऊगर्दी झाली आहे. सुटीमुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठी उठाठेव करावी लागत आहे.
माझ्या मेंढय़ांचे काय?
एका उमेदवारांच्या खास कार्यकर्त्यांने माण तालुक्यातील एकाच कुटुंबातील चार मते असलेला परिवार गाठल्यानंतर संबंधित कुटुंबाच्या प्रमुखाने एक दिवस मेंढय़ांकडे कोण पाहणार, दुसरा मजूर कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्या मजुरासाठीचा खर्च देण्याचीही मागणी केली. उमेदवाराच्या खास व्यक्तीने हसत हसत ही मागणी पूर्ण केली. याच कुटुंबातील चारही मतदारांच्या प्रवासाची सोय करण्यात आली आहेच. शिवाय मत दिल्याबद्दल जेवण आणि ठरलेला ‘भाव’ही देण्यात येणार आहे. शिवाय त्यांना गावीही परत सोडले जाणार आहे, असे याच खास कार्यकर्त्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.