सध्याची पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, बोनशेत, पळस्पे, नेवाळी आदी ६८ गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली पनवेल महापालिका स्थापन झाली असून त्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा केली आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांबाबत हरकत आणि सूचना मागवण्यात आल्या असून महिन्यानंतर सुनावणी होईल व महापालिका खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरातील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन पनवेल आणि परिसराचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल महापालिका स्थापन करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. विभागीय आयुक्तांनी सादर केलेला अहवाल नगरविकास विभागाने स्वीकारला आहे. त्यानुसार पनवेल नगरपालिकेच्या हद्दीबाहेरच्या ६८ गावांचा समावेश करून नवी महापालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच या प्रस्तावास मान्यता दिली होती. मात्र महसुली गावांचा थेट महापालिकेत समावेश करण्यासंदंर्भात विधी व न्याय विभागाने उपस्थित केलेल्या आक्षेपावरून पलिका स्थापनेबाबतचा गुंता निर्माण झाला होता.
पालिकेत समाविष्ट गावे
तळोजा पाचनंद, काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचा पाडा, कामोठे, चाल, नावडे, नावडेखार, तोंडरे, पेंधर, कळंबोली, कोल्हेखार, आंबेतखार, रोडपाली, पडघे, वळवली, पालेखुर्द, टेंभोडे, खैरणेबुद्रुक, आसूड गाव, आदई, आकुर्ली, पालीदेवद, देवद, विचूंबे, उसर्ली खुर्द, शिल्लोत्तर रायचूर, चिपळे, बोनशेत, विहिघर, चिखले, कोन, डेरवली, पळस्पे, कोळखे, शिवकर, कोर्पोली, केवाले, नेरे, हरीग्राम, नितलस, खैराणे खुर्द, कानपोली, वलप, हेदूटणे, पालेबुद्रुक, वाकडी, नेवाळी, उमरोली, आंबिवली, मोहो, नांदगाव, कुडावे, वडवली, तुरमाले, चिरवत, बीड, आडिवली, रोहिंजण, धानसर, पिसारवे, तुर्भे, करवले बुद्रुक, नागझरी, तळोजे मजूकर, घोट, कोयनाव्हेले घोट.