पनवेल : यंदा पनवेल महापालिकेने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर गणेश मूर्ती दान ही संकल्पना पहिल्यांदाच राबविली. महापालिका प्रशासनाने आवाहन केल्यानंतर दीड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी ३० आणि पाच दिवसांचे गौरी गणपती मूर्तींच्या विसर्जनावेळी २०९ कुटूंबियांनी त्यांच्या मूर्ती महापालिकेच्या पर्यावरण पूरक विसर्जनासाठी दान दिल्या. महापालिका आयुक्तांनी संबंधित कुटूंबियांना महापालिका पर्यावरण दूत या पदवीने सन्मानित करणार असल्याचे जाहीर केले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध उपनगरांमध्ये दीड दिवस आणि गौरी गणपती असे २१ हजार ४५० गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. यापैकी महापालिकेने सात हजार गणेशमूर्तींचे थेट समुद्रात विसर्जन केले आहे. पालिका क्षेत्रातील नैसर्गिक तलावांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरीसचा अंश मिसळून तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी पालिका आयुक्तांनी गणेशभक्तांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करुन पर्यावरण रक्षणाचा नवा पायंडा पाडू असे आवाहन केले होते. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या आवाहनानंतर पालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभाग स्तरावर विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये घरोघरी भेटी देऊन गणेशमूर्ती दान किंवा कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : नवी मुंबई : पावसामुळे पालेभाज्यांचे दर चढेच राहणार, बाजारात ३० ते ४० टक्के आवक घटली
याच आवाहनामुळे पहिल्याच वर्षी आतापर्यंत २३९ पर्यावरण दूत महापालिकेला सापडले आहेत. या पर्यावरण दूतांचा यथोचित सन्मान करण्यासाठी पालिका प्रशासनाने विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर पर्यावरण दूतांचा जाहीर सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त देशमुख यांनी केले आहे.