पनवेल : पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात सोमवार अखेरपर्यंत ३८२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात पालिकेला यश आले. पालिकेने यंदा ५०० कोटी रुपये थकीत कर जमा करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. सोमवारी एकाच दिवसात पाच कोटी रुपयांचा भरणा करदात्यांनी केला आहे. महापालिका आयुक्तांनी करदात्यांना मालमत्ता कर लवकरात लवकर भरण्याचे आवाहन केले आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात ३,६२,६४८ करदाते आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९७,१२५ करदात्यांनी त्यांचा ३८२ कोटी ३१ लाख रुपये पालिकेत सोमवार अखेरपर्यंत जमा केला. अजूनही १८०० कोटी रुपयांचा थकीत कर जमा करणे हे पालिकेसमोर आव्हान बनले आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी ३१ मार्च ही आर्थिक वर्ष संपण्याची शेवटची तारीख असल्यामुळे शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा पालिकेची कार्यालये खुली असणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने पनवेल महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिली नसल्यामुळे आणि पुढील आर्थिक वर्षाची दोन टक्के शास्ती वाचविण्यासाठी मार्चअखेरपूर्वी कर भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
४४७ नोटिसा आणि २७ वॉरंट
कर वसुलीसाठी १३ वसुली पथक पालिकेने स्थापन केली आहेत. आतापर्यंत पालिकेने ४४७ जप्तीपूर्वीच्या नोटिसा व २७ वॉरंट बजावले आहेत. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी ‘सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड ‘ तयार केले आहे. कर ऑनलाइन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच नागरिक www. panvelmc.org या संकेतस्थळावरुन त्यांचा कर भरु शकतील.