सिडकोच्या अखत्यारीतील नोडमधील रस्ते, वीज, गटार, अग्निशमन, घनकचरा या सारख्या नागरी सेवा सुविधांची जबाबदारी घेण्यास प्रारंभीच्या काळात तयार असेल्या पनवेल पालिकेने सुविधांचे हस्तांतर तूर्त नको, असे सिडकोला कळविले आहे. त्यामुळे नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर या सिडकोच्या नोडचे आता पालिका निवडणुका झाल्यानंतरच हस्तांतर होण्याची चिन्हे आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग आणि तोंडावर आलेल्या पालिका निवडणुका यामुळे हे हस्तांतर पालिकेने पुढे ढकलेले असल्याचे समजते.
जुनी नगरपालिका आणि नैना क्षेत्रातील २४ गावांसह सिडकोच्या अखत्यारीतील चार नोडचा समावेश करून राज्य शासनाने १ ऑक्टोबर रोजी पनवेल पालिकेची स्थापना केली. त्यामुळे सिडको नोडमधील विक्रीयोग्य भूखंड व घरे वगळता सिडको सर्व सेवा सुविधा पालिकेला हस्तांतरित करण्यास तयार होती. हस्तांतराच्या या प्रक्रियेसाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आग्रही आहेत. त्यामुळे त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सिडकोने तयारी केली असता पनवेल पालिकेने माघार घेतली आहे. पनवेल पालिकेची तिजोरी अद्याप रिकामी आहे. त्यात या नोड मधील पाणी, वीज, रस्ते, अग्निशमन सुविधा, हस्तांतरित करून घेतल्यास पनवेल पालिकेला खर्चाचा भार उचलावा लागणार होता. राज्यातील श्रीमंत महामंडळ असलेल्या सिडकोला हा आर्थिक भार उचलणे सहज शक्य आहे, पण पनवेल पालिकेला तो पेलणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेची घडी व्यवस्थित बसेपर्यंत हे नोड हस्तांतरित करू नयेत अशी विनंती पालिकेने सिडकोला केली आहे. पनवेल पालिकेत सध्या असलेल कमी कर्मचारी आणि येत्या काळात महिन्यात होणाऱ्या निवडणुका पाहता हे हस्तांतर सहा महिने लांबणीवर पडले आहे.