पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील महामार्गांवरील बसथांबे, शौचालये, उद्यान आणि विविध स्मशानभूमी तसेच देहरंग धरणाच्या परिसरात पालिकेने सौरउर्जेवरील २९० दिवे लावल्यामुळे हा परिसर उजळून निघाला आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानंतर जिल्हा नगरोत्थान निधीतून हा खर्च करण्यात आला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये १७ हजार विजेचे पोल आहेत. त्यावर २४ हजार एलईडीचे वीजदिवे सुरू आहेत. २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षात पनवेल पालिकेच्या वीज विभागाला जिल्हा नगरोत्थान निधीतून दोन कोटी १० लाखांचा निधी सौर उर्जेवरील दिव्यांसाठी मिळाला होता. शहरातील महामार्गांवरील बसथांबे आणि शौचालये तसेच स्मशानभूमी येथे अचानक वीज गायब झाल्यास पर्याय असावा यासाठी पालिका आयुक्त चितळे यांनी पालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विज विभागाचे प्रमुख प्रीतम पाटील यांना दिवे लावण्याचे आदेश देण्यात आले.
सौर ऊर्जेवरील दिवे शहरातील महामार्गांवरील मुख्य बसथांब्यावर बसविल्यामुळे शहरातील वीज गायब झाल्यानंतर रात्रीच्या वेळीस महिला प्रवाशांना त्याचा मोठा आधार होणार आहे. तसेच महामार्गांवरील शौचालयांचा परिसरात प्रकाश कायम राहील. स्मशानभूमीत रात्रीच्यावेळी या दिव्यांचा मोठा आधार मिळू शकेल.
जिल्हा नगरोत्थान निधीतून २६० दिव्यांमध्ये सहा मीटर उंचीच्या पोलवर ४५ वॅटचे २१० दिवे आणि आठ मीटर उंचीच्या पोलवर ६० वॅटचे पन्नास दिवे लावण्यात आले. या दिव्यांसोबत इंटिग्रेटेड पॅनल अंतर्भूत असल्याने पाच वर्षांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीची असल्याची माहिती शहर अभियंता कटेकर यांनी दिली. देहरंग धरणाचा परिसर ४५ वॅटच्या तीस दिव्यांनी उजळला आहे.
विद्युत वीज अचानक गायब झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी विजेचा पर्याय तातडीने असावा यासाठी सौर ऊर्जेवरील २९० दिवे पालिकेने लावले आहेत. याशिवाय पनवेल पालिका नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याच्या योजनेतून १० कोटी रुपये खर्च करुन ६४ वॅटचे हायमास्ट दिवे लावण्याचे काम हाती घेतले आहेत. – संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महापालिका