पनवेल : पनवेल महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘गुलाबी अर्थसंकल्प’ या संकल्पनेंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले. याच उपक्रमापैकी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या मुली व महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणानंतर संबंधित महिलांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना काढून देण्यासाठी प्रशिक्षण संस्था नेमण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत. तब्बल एका लाखांहून अधिक महिलांना महापालिकेच्या या योजनेचा लाभ मिळू शकेल.
पनवेल महापालिकेमध्ये सर्वाधिक महिला वाहन चालक निर्माण करण्याचा पालिकेचा हा प्रयत्न आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत राहणार आहे. सर्वाधिक स्वमालकीची वाहने असलेले शहर म्हणून पनवेलची ओळख आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल शहर, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल, खांदेश्वर ही उपनगरे आहेत. ९ लाख लोकवस्तीच्या महापालिका क्षेत्रात महिला आणि तरुण मुलींची (१८ वर्षांवरील) संख्या तीन लाखांवर आहे. आपत्तीवेळी प्रत्येक महिलेला किमान वाहन चालविता आले पाहिजे या उद्देशाने पनवेल महापालिकेचे तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी महिला सक्षमीकऱणाच्या योजनेसाठी महिला व बालकल्याण विभागाच्या लेखाशिर्षकाखाली या योजनेसाठी २५ लाखांची तरतूद केली.
यंदा आर्थिक वर्षात विद्यमान पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी शहरातील महिलांच्या सक्षमीकऱणाला चालना देण्यासाठी बुधवारी याबाबतची निविदा जाहीर करुन महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून त्यांचे दरपत्रक मागविले आहे. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी पात्र असाव्यात तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडे त्या नोंदीत असाव्यात अशा अटींच्या अधीन या निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. या योजनेमधून महापालिका क्षेत्रातील सर्वच घटकांमधील महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण मोफत मिळू शकेल.
ही योजना राबविण्यासाठी सध्या वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निवडीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम झाल्यावर महापालिकेतील सर्वच प्रभाग स्तरावर याबद्दल महिलांकडून अर्ज मागवले जातील. त्यानंतर प्रत्यक्षात वाहन चालविण्याचे प्रशिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिकाऊ वाहन चालविण्याचा परवाना संबंधित प्रशिक्षण संस्थेकडून काढून दिले जातील. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कैलास गावडे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका