पनवेल : पनवेल शहर महापालिकेने पुन्हा वर्षाच्या सुरुवातीला १५६ कोटी रुपयांच्या रस्ते बांधकामाची कामे हाती घेतली असून ही कामे कळंबोली, खारघर, कामोठे या वसाहतींबरोबरच पनवेल शहर आणि तोंडरे गावात केली जाणार आहेत. या कामांमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणासाठी विकासकामांच्या निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर वर्षभरात ही कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : महापालिकेत १२० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या
पनवेल महापालिका क्षेत्रात चार महिन्यांपूर्वी पालिका प्रशासकांनी २३७ कोटी रुपयांची रस्त्यांची विकासकामे सिडको वसाहतींमध्ये हाती घेतली. या कामांचे कार्यादेश संबंधित ठेकेदारांना देण्यात आले असून येत्या आठवडाभरात २३७ कोटी रुपयांचे रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू होईल. मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामानंतर पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिका क्षेत्र खड्डेमुक्त करण्याचे नियोजन केले होते. त्याच संकल्पनेचा दुसरा टप्पा म्हणून पनवेलमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांच्या ५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरीनंतर पनवेल पालिकेने १५६ कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे. सुमारे ४०० कोटी रुपये पालिका रस्त्यांसाठी खर्च करणार असल्याने काही महिन्यांत रस्त्यांची कामे सर्वत्र सुरू होतील. रस्त्यांबरोबरच पालिकेने यातील काही रस्त्यांशेजारील पावसाळी पाणी वाहणाऱ्या गटारांची खोली व रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल या सिडको वसाहतींमध्ये मागील सहा वर्षांत पनवेल महापालिकेने मोठी कामे हाती घेतली नव्हती. स्वच्छता आणि आरोग्याची सुविधा वगळता रस्त्यांकडे पालिकेने उशिराने लक्ष केंद्रित केले.
हेही वाचा >>> इंग्रजी नर्सरी सुरू करण्याचा महापालिकेचा घाट, वाद निर्माण होण्याची शक्यता
सर्वसाधारण सभेत मंजुरीनंतर संबंधित रस्त्यांच्या कामांविषयी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर कामे सुरू होतील. सिडको वसाहतींचा परिसर हस्तांतरणानंतर पहिल्यांदा पनवेल पालिका रस्त्याची कामे करत आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार खड्डेमुक्त पनवेल यासाठी ही सर्व कामे केली जाणार आहेत. – संजय कटेकर, कार्यकारी अभियंता, पनवेल पालिका सर्वाधिक खर्च खारघर नोडमधील रस्त्यांसाठी १५६ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये पालिकेने सर्वाधिक ३२ कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च प्रभाग समिती अ मधील खारघर नोडअंतर्गत डांबरी रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाचे काम होणार आहे. तसेच २५ कोटींची तीन आहेत. तोंडरे गावातील जलकुंभ ते हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, पावसाळी गटारे, पनवेल शहर आणि कळंबोलीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, २२ कोटी रुपये कामोठेतील अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कळंबोलीत १६ कोटी रुपये रस्ते डांबरीकरण कामासाठी केला जाणार आहे.