लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे सालाबादाप्रमाणे पनवेल शहरातील नागरिकांना गुरुवारपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पनवेल महापालिकेने मंगळवारी याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध करुन कोणत्या जलकुंभावरील पाणी ग्राहकांना आठवड्यातील कोणत्या दिवशी पाणी मिळणार नाही याची सूचना प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी २९ डिसेंबरला पाण्याचे नियोजन करावे लागले होते. यंदा मार्च २० पासून पालिकेला नियोजन करावे लागले.

पनवेल शहरातील रहिवाशांना ३२ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. देहरंग येथील अप्पासाहेब वेदक धरणातील शिल्लक पाण्याचा साठा संपूर्ण उपसा केला तर मे महिन्यापर्यंत जलाशयातील सर्व पाणी संपून जाईल. यासाठी महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या संस्थांकडून पाताळगंगा नदीतील उसनवारीने पाणी घेऊन पनवेल शहरातील नागरिकांना पुरवठा केला जातो.

रविवार आणि सोमवार पाताळगंगा नदीतून मिळणारा पाणी पुरवठा कमी होतो. तसेच इतरवेळी तांत्रिक दुरुस्तीच्या कारणामुळे पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने देहरंग धरण आणि पाताळगंगा नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी पनवेल शहरातील ९ वेगवेगळ्या जलकुंभनिहाय पाणीपुरवठा केला जात असल्याचे पनवेल पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विलास चव्हाण यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

अमृत योजनेचे काम संथगतीने

पनवेलकरांना सध्या एमजेपीकडून १५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी मागील वर्षी मार्च महिन्यात शासनाने अमृत योजनेतून १० एमएलडी वाढीव पाणी पुरवठा पनवेलसाठी मंजूर केला. परंतु एमजेपीची योजना अजूनही कार्यान्वित न झाल्याने या वाढीव पाणीपुरवठा करुनही त्याचा लाभ पनवेलकरांना मिळू शकला नाही. अमृत योजनेचे काम संथगतीने होत असल्याचा मोठा फटका रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

Story img Loader