पनवेल ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पनवेल महापालिकेच्यावतीने शहरातील ४८ विविध उद्यानांमध्ये तब्बल ११०० वृक्षांचे रोपणाचा कार्यक्रम पालिकेने बुधवारी हाती घेतला. पनवेल पालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते खारघर वसाहतीमधील सेक्टर १२ मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उद्यानामध्ये वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी पालिकेचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, महापालिका अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्त डॉ. रसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, माणूस हा निसर्गाचा पुत्र आहे. पर्यावरणाचा विकास करणे म्हणजे पर्यावरणांमध्ये ढवळाढवळ न करणे. निसर्ग आहे तसे त्याचे जतन करणे महत्वाचे आहे. म्हणूनच महापालिकेने ११०० झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका देशी झाडांचे रोपण करत असून भविष्यातील पिढीला पक्षांचे आवाज ऐकवायचे असतील झाडे लावली पाहिजेत,त्यांचे जतन करायला पाहिजे असे मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये डॉ. रसाळ यांनी केले. 

हेही वाचा >>> पनवेल: अखंडीत वीज समस्येसाठी वीजग्राहक, महावितरण कंपनीच्या अधिका-यांची तळोजात बैठक

खारघर वसाहतीसोबर बुधवारी पालिकेच्यावतीने कळंबोली मधील सेक्टर ६ ई भूखंड क्रमांक २ येथील उद्यान येथे उपायुक्त कैलास गावडे यांनी वृक्षारोपन केले. तसेच नवीन पनवेल येथील सेक्टर ११ येथील उद्यानामध्ये मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, आरोग्य निरीक्षक अरूण कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नावडे उपविभाग येथे सेक्टर ९ मध्ये उपायुक्त बाबासाहेब राजळे, सेक्टर १५ मधील उद्यानामध्ये लेखाधिकारी संग्राम व्होरकाटे, प्रभाग अधिकारी अमर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कामोठे येथे उपायुक्त मारूती गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उप अभियंता राजेश कर्डिले,आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पनवेल शहरामध्ये सेक्टर १६ मध्ये शहर अभियंता संजय जगताप, महात्मा गांधी उद्यानामध्ये सहाय्यक स्वरूप खारगे, कल्पतरू उद्यानामध्ये लेखा परीक्षक संदीप खुरपे प्रभाग अधिकारी रोशन माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या शिवाय इतर राहिलेल्या उद्यान्यांमध्ये वृक्ष प्राधिकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

हेही वाचा >>> नवी मुंबई : रस्त्यावर भिक्षा मागण्यासाठी हप्ता देण्यास नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर जीवघेणा हल्ला

पालिकेने बुधवारी केलेल्या वृक्षारोपणात वड,पिंपळ, कडूनिंब, ताम्हणफूल, नांद्रुक, आकाशनिंब, बहावा, अर्जुन, बिट्टी, अर्जुन, जांभूळ, करंज, पळस, प्राजक्त, सोन चाफा, अशोक, सप्तपर्णी, कुसूम, बकुळ, कदंब शिसव, सुबाभूळ, नारळ, सिता अशोक, शमी, आपटा या देशी प्रजातींच्या झाडांची निवड केली.  

खारघार व नावडे प्रभागातील उद्यानांमध्ये ५११, कामोठ्यातील सात उद्यानांमध्ये ८३, पनवेल शहर व नवीन पनवेल मधील १८ उद्यानांमध्ये १६६, कळंबोली व खांदा कॉलनीतील १६ उद्यांनामध्ये ३३६ झाडे लावली पालिकेच्या बुधवारच्या वृक्षारोपण कार्यक्रमांत विविध सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. खारघरमधील इन्फिनीटी संस्था, पोदार प्रेप, पनवेलमध्ये भारत विकास परिषद, कळंबोली येथे ‘आई’ शैक्षणिक व सामाजिक संघटना, कामोठेमध्ये पर्यावरण प्रेमी ग्रुप यांचे सहकार्य महापालिकेस मिळाले. तसेच ट्युलिप अंतर्गत इंटर्नशिपसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी खारघर उद्यानामध्ये ‘पर्यावरणाचे रक्षण’ याविषयावर लघुनाटिका सादर केली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel municipal corporation on planted 1100 trees in 48 parks on occasion of world environment day zws
Show comments