पनवेल : पनवेल महानगरपालिकेने यंदाच्या सरत्या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते गाठण्यासाठी अटकावणीच्या कार्यवाहीला जोरदार सुरूवात केली आहे. गुरुवारी पालिकेच्या कर विभागाने लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या २०० करदात्यांच्या नावाची यादी विविध वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केली. कर थकविणाऱ्यांमध्ये कारखानदार, व्यापारी, शालेय संस्था, रुग्णालय, सरकारी कार्यालये, मॉल, हॉटेल या आस्थापनांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.
थकीत करदात्यांना कराची रक्कम भरण्यासाठी पुढील पाच दिवसांची मुदत पालिकेने दिली आहे. विहित मुदतीत कर न भरल्यास संबंधित करदात्याविरोधात वॉरंट काढून मालमत्ता अटकावणी तसेच मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा पालिकेने दिल्याने करदात्यांचे धाबे दणाणले आहेत.राज्यातील इतर महापालिकांमध्ये मालमत्ता करावरील ५० टक्के विलंब शास्तीवरील माफीची अभय योजना राबविली असली तरी पनवेलमध्ये ही योजना राबविण्यात आलेली नाही. या दरम्यान पनवेल पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांनी सध्या करवसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र आहे. पालिका आयुक्तांनी पालिकेच्या कर विभागाला मार्च अखेरीपर्यंत थकीत कराच्या रकमेतील ५०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी १३ विविध पथके पालिकेच्या सर्वच प्रभागांत काम करत आहेत. लाखो रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या करदात्यांची नावे पालिकेने गुरुवारी प्रसिद्ध केल्यामुळे मोठ्या कारखानदार आणि आस्थापना चालकांची चिंता वाढली आहे. यामध्ये सरकारी आस्थापनांची सुद्धा नावे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
थकबाकीदारांची नावे सरकारी कार्यालये
सल्लागार कॉटन कॉर्पोरेशन (कळंबोली), महाराष्ट्र राज्य विज वितरण कॉ.ऑप. लि. (खारघर), एमटीडीसी युथ हॉस्टेल (खारघर), खारघर व्हॅली गोल्फ कोर्स, भारत संचार निगम (पनवेल), राष्ट्रीय इस्पात निगम, नागरी घनकचरा प्रकल्प, तळोजा सी.ई.पी.टी., बल्क सिमेंट कॉर्पोरेशन इंडीया लि., सेल इंडिया मार्केट, महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटींग फेडरेशन स्टील मार्केट यार्ड व इतर.
कारखाने
दीपक फर्टिलायझर अँड पेट्रोकेमिकल, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट, ओवेन्स कॉर्निंग इंडिया लि., व्ही. व्ही. एफ कंपनी, युनायटेड ब्रेवरीज, दी पंचमहाल डिस्ट्रिक्ट कॉ.ऑप. मिल्क प्रोड्युसर्स, आदित्य बिर्ला सायन्स अँड टेक्नोलॉजी. यासह ५० हून अधिक रुग्णालय आस्थापना.