पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील निम्म्या परिसरासाठी प्रारूप विकास आराखडा जाहीर झाला आहे. यात पुढील २० वर्षांसाठी या आराखड्यामध्ये ६२९ ठिकाणी आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली असून, आरक्षणानुसार २९ गावांचा प्रभावक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून विकास करण्यासाठी पालिकेला ७,३५८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, विरार अलिबाग कॉरीडॉर, नैना क्षेत्र यांच्यासोबत पालिकेच्या २९ गावांमध्ये विकासाची गंगा पोहचण्यासाठी प्रत्येक गावात प्रशस्त रस्त्यांचे जाळे प्रत्येक गावापासून १ किलोमीटर अंतरावर ४२ ठिकाणी शाळा, नवीन पनवेल (पश्चिम) येथे १५ एकर जागेवर विज्ञान व प्रदर्शन केंद्र, १४५ ठिकाणी खेळांची मैदाने व बगीचा, ४७ ठिकाणी वैद्याकीय सुविधा केंद्र, घोट चाळ या परिसरात ६२ एकर क्षेत्रावर नागरी घनकचरा व्यवस्थापन केंद्र आणि ५ वेगवेगळे अग्निशमन केंद्रांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे. विकास आरखड्यातील आरक्षणाविषयी नागरिकांना सूचना व हरकती घेण्याची मुभा ८ सप्टेंबरपर्यंत असल्याची माहिती सोमवारी सकाळी पालिका मुख्यालयातील सभागृहात पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली. तुर्भे गाव ते तळोजापर्यंत मेट्रोचा प्रस्ताव या विकास आराखड्यात मांडण्यात आला आहे.
हेही वाचा : सट्टा बाजारात गुंतवणूक करा भरघोस परतावा मिळवा …. फसव्या जाहिरातीला बळी पडून १३ कोटी ५६ लाख गमावले
पनवेल पालिकेचे एकूण क्षेत्रफळ ११०.०६ चौ. किमी आहे. तीन दिवसांपूर्वी पालिकेने जाहीर केलेला प्रारूप विकास आराखडा ६०.७८ चौ. किमी क्षेत्रासाठी असल्याने २०४४ साली या ६०.७८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील लोकसंख्या १२ लाख ५ हजार अपेक्षित धरून हा आराखडा बनविण्यात आला आहे. मागील पाच वर्षात तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या काळात विकास आराखडा बनविण्याच्या कामाला वेग मिळाला. नवी मुंबई महापालिकेपेक्षा गतिमान पद्धतीने पनवेल महापालिकेचा विकास आराखडा बनविण्यात आल्याने विद्यामान पालिका आयुक्त चितळे यांनी नगररचना विभागाच्या प्रमुख ज्योती कवाडे यांच्यासह पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. या आराखड्यामुळे पालिकेच्या ग्रामीण भागातील विकास कामांना चालना मिळणार असल्याचे आयुक्त चितळे म्हणाले. तसेच ग्रामीण पनवेलमधील शेतकऱ्यांच्या विकास आराखड्याबद्दल तक्रारींचे निरसन करण्यासाठी किंवा हरकती नोंदविण्यासाठी पालिका शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी पुढील तीन दिवसांत समन्वयक नेमणार असल्याचे पालिका आयुक्त चितळे यांनी पत्रकारांना सांगितले.
हेही वाचा : नवी मुंबई : स्टॉलधारकांचे रस्त्यावरच बस्तान, एपीएमसी धान्य बाजारात रस्त्यावर साहित्य विक्री
आराखड्याची वैशिष्ट्ये
● ६०.७८ चौ.कि.मी. क्षेत्राचे एकूण ५ वेगवेगळ्या नियोजन स्तरावर विभाजन.
● ६० , ४५ , ३६ , ३० , २४ , १८ , आणि १५ मी. व १२मी. रुंदीचे रस्ते प्रस्तावित.
● तुर्भे गाव ते बेलापूर-पेंधर मेट्रो आणि प्रस्तावित कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिका यांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक पार्किंग व वाहतुकीचे नियोजन.
● आडिवली गावात भव्य मनोरंजन पार्क उभारण्यासाठी आरक्षित क्षेत्र.
● तुर्भे, पिसार्वे, धानसर, रोहिंजण, आडिवली, पनवेल, नवीन पनवेल (पश्चिम), कळंबोली येथे बस आगार प्रस्तावित.
● घोट चाळ येथे सध्या सिडको मंडळाचा नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू आहे. याच परिसरात ६२ एकर जागेवर घनकचरा व्यवस्थापन केंद्र पालिकेने प्रस्ताविते. यापुढे नव्या विकास आराखड्यानुसार बांधकाम परवानगी घेताना ५०० मीटरचे बफर झोन ठेवूनच बांधकाम परवानग्या आवश्यक.
हेही वाचा : शाळांच्या वेळेतील बदल कागदावरच! तूर्त शाळा जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच सुरू राहणार
● कळंबोली येथील खिडुकपाडा, घोटचाळ, नवीन पनवेल (पश्चिम) येथे एकूण ३५ एकर जागेवर ट्रक टर्मिनल प्रस्तावित.
● २५० एकर क्षेत्रावर १४५ ठिकाणी बगीचे व खेळाची मैदाने प्रस्तावित.
● कामोठे येथे २० एकर जागेवर कांदळवन उद्यान प्रस्तावित.
● पनवेल शहरासह, नवीन पनवेल वसाहत, तळोजे मजकूर व धानसर गावांमध्ये बेघरांकरिता ७ एकर क्षेत्रावर घरे बांधण्यासाठी आरक्षण जाहीर.