पनवेल : पनवेल महापालिकेने सौर ऊर्जेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. मागील अनेक महिन्यांपासून पालिकेतील विविध मालमत्तांवर सौर यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. या ऊर्जा निर्मितीमधून तब्बल एक हजार किलो वॅटची वीज निर्मितीसाठी विविध ठिकाणी पालिकेने कामे हाती घेतली आहेत. यासाठी पालिका स्वनिधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तब्बल १० कोटी रुपये खर्च कऱणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रत्येक महापालिकांना जास्तीत जास्त सौर ऊर्जेची निर्मिती केंद्र बनण्याचे लक्ष्य दिले आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सुद्धा अनेक महिन्यांपासून महापालिकेच्या प्रत्येक मालमत्तांवर अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची यंत्रणा बसविण्याचे आदेश पालिकेच्या वीज विभागाला दिले. सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर ज्याठिकाणी वीज जोडणीची समस्या किंवा वारंवार वीज पुरवठा खंडित होतो अशा ठिकाणी करावा असे आदेश आयुक्त चितळे यांनी दिले होते.

पालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर आणि वीज विभागाचे प्रमुख प्रीतम पाटील यांनी सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी अशा ठिकाणांची निवड केली. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील ६० सार्वजनिक शौचालयांची निवड करण्यात आली. यातील अनेक शौचालये शीव-पनवेल महामार्गांवर आहेत. तसेच ३७ विविध बसथांबे निवडण्यात आले. अनेकदा महामार्गांवरील बसथांब्यापर्यंत वीज पुरवठा करणे शक्य होत नसल्याने सौर ऊर्जा हा उत्तम पर्याय प्रवाशांना मिळणार आहे. तब्बल ९७ ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा यंत्रातून २ किलो वॅट वीज निर्माण होईल.

महापालिका लवकरच खारघर येथील स्काय वॉकवर सौर ऊर्जेचे यंत्रणा बसविणार आहे. यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामधून ६०० किलो वॅटची उर्जा निर्माण होईल. जिल्हा नियोजन समितीच्या मंजूरीनंतर हे काम हाती घेतले जाईल. तसेच महापालिकेच्या १० वेगवेगळ्या मालमत्तांवर पालिका सौर ऊर्जा यंत्र बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल शहरातील अग्निशमन दलाची इमारत, पनवेल शहरातील प्रभाग समिती (ड) कार्यालय, खारघर येथील आयुक्त निवासस्थान, पनवेल शहरातील उर्दू विद्यालय, कळंबोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कळंबोली येथील प्रभाग समिती कार्यालय, पनवेल शहरातील गावदेवीपाडा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोळीवाडा येथील आरटीपीसीआर प्रयोगशाळा, कामोठे येथील प्रभाग समिती कार्यालय अशा १० ठिकाणी बसवलेल्या सौर उर्जा यंत्रातून ३५२ किलो वॅटची ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे.

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पनवेल महापालिकेने सौर ऊर्जा निर्मितीवर पालिकेच्या मालमत्ता असाव्यात यासाठी हे नियोजन केले आहे. यामधून अपारंपारिक ऊर्जा निर्मिती होईल. तसेच पालिकेचा वीज देयकावरील खर्च कमी होईल. ज्या ठिकाणी महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा करणे शक्य होत नाही अशा ठिकाणी सौर ऊर्जा हा चांगला पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध राहील. -कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका