लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचा १८४२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने पालिका आयुक्तांनी सर्वच प्रभागांमध्ये करवसुलीसाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस आणि वॉरंट बजावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. ज्या आस्थापनांचा मालमत्ता कर अधिक भरणे आहे, अशा आस्थापना पालिकेच्या रडारवर आहेत. लवकरच अशा आस्थापनांवर जप्तीची कारवाई करणार असल्याचा इशारा यापूर्वीच पालिकेने दिला होता.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३ लाख ६२ हजार ४५ मालमत्ताधारक आहेत. यामधील ४४७ आस्थापनांचा अधिकचा मालमत्ता कर थकविल्याने त्या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस व २७ मालमत्ता धारकांना वॉरंट बजावले आहेत. नुकतीच तळोजा येथील मे. वॉलरेक मॉड्यिलर सिस्टक कंपनीवरती दोन कोटी २० लाख ४०३८५ रुपयांच्या थकबाकीसाठी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेची ३२६ कोटी इतकीच मालमत्ता करवसुली झाली. पालिकेला करातून मिळणाऱ्या महसूली उत्पन्नातून विविध विकासकामे करता येणार असल्याने मालमत्ता कर उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक महेश गायकवाड व करअधीक्षक सुनील भोईर यांच्या जप्ती पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. यात खारघर,उपविभाग नावडे, कळंबोली कामोठे,पनवेल व नविन पनवेल प्रभागामधील थकबाकीदारांना जप्ती व अटकावणीच्या कारवाईचा समावेश आहे.

पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी न घेता काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. मालमत्ता कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पालिका करदात्यांना करत आहे. मालमत्ता कराचा भरणा न केल्यास जप्ती व अटकावणी कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना करदात्यांना दिल्या जात आहेत.

कर भरण्यासाठी…

मालमत्ता कर न भरल्यास थकीत कर ठेवणाऱ्या करदात्यांना शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत आहे. पालिकने मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाइल ॲपवर तसेच www. panvelmc.org या संकेतस्थळावर आपला मालमत्ता कर भरु शकतात. काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन पालिकेने केले आहे.