चर्चासत्रात कामोठे, खांदेश्वर, खारघरमधील रहिवाशांचा संताप
पनवेल महानगरपालिका झाल्यास सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होणार नसेल तर त्याचे गंभीर परिणाम राजकीय नेत्यांना भोगावे लागतील, अशा शब्दांत नागरिकांनी चीड व्यक्त केली. सामाजिक क्षेत्रातील ‘गोल्डन ग्रुप’च्या वतीने सोमवारी शहरातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
पनवेल महानगरपालिका झाल्यास शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्यांना किती प्रमाणावर कर भरावा लागेल, या प्रश्नाने अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेष करून कामोठे आणि खारघर येथील रहिवाशांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडे काही आराखडा आहे का, असा सवाल कामोठे येथील रहिवाशांनी विचारला.
चर्चासत्रात राजकीय क्षेत्रातील पुढारी, विकासक आणि उद्योजकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती. त्यामुळे चर्चेचा रोख हा सामान्यांच्या दिशेने जाणार नाही, अशी शंका आल्याने काही रहिवाशांनी पाणीप्रश्नावर तावातावाने आपली मते मांडली. चर्चासत्राला प्रशासनातील एकही व्यक्ती हजर नव्हती, असे कामोठे वसाहतीतील दिलीप चव्हाण म्हणाले. या वेळी सुभाष देशपांडे, आस्वाद पाटील, बबन जगनाडे यांनी पायाभूत सुविधांबाबत मते व्यक्त केली.
दोन तास चाललेल्या या चर्चासत्राचे सूत्रसंचालन एका दैनिकाच्या संपादकांनी केले. मात्र त्यांनाही रहिवाशांच्या प्रश्नाचा मारा सहन करावा लागला.
चर्चासत्रास माजी आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, चंद्रशेखर सोमण, जयंत पगडे, शिवदास कांबळे, जगदीश गायकवाड, बिल्डर असोशिएशनचे अध्यक्ष किशोर म्हात्रे, विलास कोठारी, उद्योजकांचे प्रतिनिधी विजय लोखंडे, जयश्री काटकर आदी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीसाठीचा अभिप्राय सिडकोने नुकताच अभ्यास समितीकडे पाठविला आहे.
‘स्मार्ट सिटीसाठीचे पैसे प्रथम खर्च करा’
चर्चासत्रात माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, सिडकोने ‘स्मार्ट सिटी’साठी जाहीर केलेले ३४ हजार कोटी रुपये खर्च झाल्यानंतर मगच महानगरपालिकेची निर्मिती करावी, अशी भूमिका घेतली. बिल्डरांतर्फे विलास कोठारी यांनी नैना आणि सिडकोपेक्षा महानगरपालिका आल्यास येथील रहिवासी आणि शेतकऱ्यांचे भले होईल, अशी भूमिका मांडली.चंद्रशेखर सोमण यांनी पालिका झाल्यास पनवेलकरांच्या पायाभूत सुविधेत कोणती भर पडणार याची माहिती प्रथम द्यावी लागेल, असे स्पष्ट केले. महानगरपालिका अस्तित्वात आल्यास सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाचा गाढा हाकला जाईल. त्यामुळे हा निर्णय योग्य असल्याचे पनवेल नगरपालिकेचे सदस्य जयंत पगडे यांनी सांगितले.