पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी सोडत पद्धतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आरक्षण जाहीर झाले. तालुक्यातील शेकाप व भाजप या दोन्ही परस्पर विरोधी राजकीय पक्षांना नवख्यांना संधी देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
शेतकरी कामगार पक्षाचे गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल पंचायत समितीची धुरा सांभाळणाऱ्या काशिनाथ पाटील यांची नव्या आरक्षणामुळे या गणातून निवडणूक लढण्याची संधी हुकली असून पालेबुद्रुक गणाला अनुसूचित जमातीच्या महिलेला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.पनवेल पंचायत समितीच्या १८ जागांपैकी नऊ जागांवर महिलांसाठी आरक्षित झाल्या. यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी ४ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी २ जागा, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी २ जागा तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एक जागा आरक्षित झाली. याशिवाय सर्वसाधारण जागेसाठी ६ जागा, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २ जागा राखीव, अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित झाली.
पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. तालुक्यातील वांवजे, आदई, पालीदेवद, कोळखे या चार गणांमध्ये सर्वसाधारण महिलेला संधी मिळाली. तर नेरे व गव्हाण या गावातील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित झाला. पालेबुद्रुक, पोयंजे या गणांमध्ये अनुसूचित जमातीच्या महिलेला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. तर विचुंबे या गणाचे नेतृत्व अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील स्त्री करणार आहे. दुंदरे, वावेघर, पळस्पे, वडघर, केळवणे, आपटा या गणांमधील सर्वसाधारण प्रवर्गाना संधी मिळाली असून ओवळे व वहाळ या गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गाचे पुरुष नेतृत्व करू शकतील. शिरढोण गणातून अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाला संधी मिळाली आहे.