पनवेल : १९ वर्षांपूर्वीची २६ जुलै २००५ च्या पूराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पनवेल पालिका कंबर कसून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करत आहे. मागील तीन दिवसांपासून सततच्या पावसामुळे शहरात गुरुवारी दुपारी पासून साचण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी अति मुसळधारांची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्यामुळे तोच दिवस व तीच वेळ पुन्हा येऊ नये यासाठी पनवेल महापालिकेने सर्वाधिक लक्ष समुद्रसपाटीपेक्षा अडीच मीटर खोल असणार्‍या कळंबोली वसाहतीवर केंद्रीत केले आहे. पालिका प्रशासनाच्या संपूर्ण यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे आदेश गुरुवारी आयु्क्त मंगेश चितळे यांनी दिले. सखल भागात जेथे पाणी सर्वाधिक साचते त्या परिसरात लक्ष केंद्रीत करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची प्रभाग निहाय नेमणूक केली आहे. 

गुरुवारी पहाटेपासून जोरधारा पनवेलमध्ये सुरूच आहेत. शहरातील पावसाचा पाण्याचा निचरा समुद्रातील पाण्यात होण्यापूर्वीच समुद्रातही भरती मोठ्या प्रमाणात असल्याने पावसाळी नाले व रस्त्यांवर सखल भागात पाणी साचत असल्याने गुरुवारी सकाळपासून पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना २४ तास सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या. कळंबोली वसाहत सिडकोने खोल वसविल्याने येथे पाणी लवकर साचते. त्यामुळे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त भारत राठोड यांनी कळंबोलीमधील विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. कळंबोली मध्ये २९ मोटार पंपाच्या माध्यमातून रस्त्यावरील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. तसेच अतिरीक्त आयुक्त व उपायुक्त कैलास गावडे यांनी पनवेल शहरातील कोळीवाडा, पटेल मोहल्ला, भारत नगर झोपडपट्टी या परिसरातील पूर स्थितीची पाहणी केली.

हेही वाचा…नवी मुंबई: कपडे धुण्याच्या मशीन खरेदीत २ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक 

गुरुवारी गाढी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कच्छी मोहल्ला व पटेल मोहल्ला  येथील नागरिकांना सुरक्षित जागी उर्दु प्राथमिक शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आले. स्थलांतरीत नागरिकांना चहा ,जेवण, आरोग्य सेवा व पाण्याची सोय पनवेल महानगरपालिका तर्फे करण्यात आली आहे. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने मदत सुरू करण्यात आली आहे. 

चारही प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्यांना पाणी साचण्याच्या घटनांवर लक्ष्य ठेवणार आहेत. ८ जुलैच्या मुसळधार पावसात कळंबोली वसाहतीमध्ये पाणी अनेक तास साचले होते. त्यामुळे आयुक्त चितळे यांनी या वासहतीमधील पाणी उपसा करण्यासाठी ठेवलेले २९ वेगवेगळे मोटारपंप सातत्याने सुरू ठेवण्याचेही सुचविले आहे. 

हेही वाचा…उरण : धो- धो मुसळधार पावसात जेएनपीए कामगारांचे प्रशासना विरोधात आंदोलन

नागरिकांच्या सुरक्षितता व काळजी घेण्यासाठी महापालिका तत्पर असून कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. महापालिकेच्या सर्व विभागांनी आपापसात समन्वय ठेवून “अलर्ट मोड’ वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना करावे – मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका