गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेऊन या मार्गावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पनवेल-चिपळूण या गणेशोत्सव स्पेशल (०११०७) डीईएमयू १२ डब्यांच्या रेल्वेगाडीला शुक्रवारी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखविला. सकाळी अकरा वाजून अकरा मिनीटांनी झालेल्या या कार्यक्रमासाठी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, प्रवासी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.डीईएमयू ०११०७ ही नवी कोरी गाडी सकाळी दहा पंचावन्नला पनवेल स्थानकाच्या पाच क्रमांकाच्या फलाटावर आल्यानंतर प्रवाशांनी गणपती बाप्पा मोरया असा गजर केला. या गाडीच्या स्वागतासाठी प्रवासी संघाच्या महिला कार्यकर्त्यांनी स्थानक परिसरात रांगोळ्या काढल्या होत्या तसेच फुलांची सजावट केली होती. अनेक प्रवाशांनी रेल्वेमंत्री सूरेश प्रभू यांच्या निर्णयाचे स्वागत करत ही गाडी नियमीत चालवण्याची मागणी केली. १२ डब्यांच्या या गाडीमध्ये ७५ आसनांचा एक डबा वातानुकूलित असून त्याचे तिकीट ३९५ रुपये, तर इतर डब्यांचे तिकीट पन्नास रुपये आहे. पनवेलहून पाच तासांत ही गाडी चिपळूण गाठेल. पनवेलहून कोकणात थेट जाण्यासाठी ही पहिली गाडी असल्याने प्रवाशांनी या गाडीचे चालक एम. एम. वानखेडे, अरुण के.आर.सिंग, एम. शेखर, योगेश गर्ग यांचेही आभार मानले. आपल्या शहरातून कोकणाकडे जाणारी ही पहिलीच रेल्वे असल्याने आमदार ठाकूर यांच्यासह जमलेल्या सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद दिसत होता. पनवेलचे टर्मिनल होणार याची प्रसिद्धी दहा वर्षांपासून होत आहे. मात्र पनवेल चिपळून गाडी सुरू झाल्याने पनवेलकर प्रवाशांना हक्काने बसण्याचे आसन मिळेल अशी भावना पनवेलच्या सामान्य प्रवाशांनी व्यक्त केली. पन्नास प्रवाशांनी शुभारंभाच्या या गाडीतून प्रवास केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवासी म्हणतात..
मला पनवेलहून रोह्य़ाला रुग्णालयाच्या कारणास्तव यावे लागते. मी मुंबईत येताना रेल्वेने येतो मात्र जाताना रुग्णालयाचे काम आटपल्यावर एसटीशिवाय पर्याय नसतो. ही गाडी सुरू झाल्याने पैशांची बचत होईल. गणेशोत्सवात सरकारने ही सुरू केलेली गाडी कोकणवासीयांसाठी फायदेशीर आहे. सरकारने ही गाडी नियमीत करण्याचा विचार करावा.
दिलीप पाटील

मी खारघरला रहात असून पेणला निघालो आहे. या गाडीचा पहिला प्रवासी होताना मला आनंद होत आहे. पनवेलकरांसाठी गणेशोत्सवाच्या काळात का होईना हक्काची सोय झाली. या गाडीमुळे गणपती पावला असे म्हणावे लागेल.
सुभाष खेडेकर

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel queen starting from panvel