पनवेल : पनवेल रेल्वेस्थानकात कधीही दुर्घटना घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी व सायंकाळी नोकरदारवर्ग कामावर जाताना आणि कामावरुन घरी परतताना पुल ओलांडताना अक्षरक्षः स्थानकातील पादचारीपुलावरील गर्दी पाहून काळजात धडकी भरते. महिला व जेष्ठ नागरीक तसेच बालक प्रवाशांनी या गर्दीत कशी वाट काढावी हा प्रश्न मनात पडतो. काही वेळाने गर्दी कमी होईल म्हणून महिला व जेष्ठ नागरिक काही मिनिटे थांबतात मात्र गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. मग स्वताच्या जिवाची काळजी करणारे प्रवासी अक्षरशा रुळावरुन चालत नवीन पनवेलच्या दिशेकडे आपली पाऊले टाकतात. हे वास्तव सध्या पनवेलच्या रेल्वे स्थानकामधील आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सामंत शाळेत अल्पवयीन मुलांच्या भांडणात एकाचा मृत्यू तर एक जखमी; जखमीवर मनपा रुग्णालयात उपचार सुरू

मागील महिन्यात पनवेल रेल्वेस्थानकाला स्वच्छतेसाठी मुंबई परिसरातील सर्वाधिक स्वच्छ असा पुरस्कार मिळाला. पनवेल रेल्वेस्थानक हे जंक्शन होत आहे. दररोज या स्थानकातून सूमारे सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. यातील पन्नास हजार प्रवासी नवीन पनवेल परिसरातून मुंबई, ठाणे व इतर उपनगरीय रेल्वे गाड्या पकडण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर करतात. नवीन पनवेल व रेल्वेस्थानक जोडण्यासाठी सध्या हाच एक पुल प्रवाशांसाठी शिल्लक आहे. पनवेल रेल्वेस्थानकामध्ये ३६२ एक्सप्रेस व जिल्ह्यात जाणा-या रेल्वे येतात. तसेच ८५ मालवाहू गाड्या या स्थानकात येतात. सध्या स्थानकात विस्तारीकरणाचे काम सूरु आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. एक्सप्रेसमधून उतरणा-या प्रवाशांना गर्दीतून पाठीवरील बोजा घेऊन मार्ग काढावा लागतो. या गर्दीचा भयानक अनुभव सध्या पनवेलचे रेल्वे प्रवासी घेत आहेत. पादचारी पुलावरील ही गर्दी टाळण्यासाठी हताश झालेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडून बेकायदा व जिवघेणा प्रवास करत आहेत.

या परिस्थितीमध्ये प्रवाशांची सूरक्षा वा-यावर असून वेळीच उपाययोजना न केल्यास अपघाताला आमंत्रण मिळू शकेल अशी स्थिती पनवेल स्थानकात निर्माण झाली आहे. याबाबत रेल्वे स्थानक प्रबंधकांसोबत संपर्क होऊ शकला नाही. 

हेही वाचा : नवी मुंबई : वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम, ८ हजार ९१ विना हेल्मेट…

मी दररोज पनवेल स्थानकातून नवीन पनवेल दिशेकडे जाण्यासाठी प्रवास करतो. सध्या स्थानकातून दररोज सकाळी व सायंकाळी पादचारी पुलावरुन प्रवास करताना थरारक अनुभव येतो. गर्दी वाढलीय ठिक आहे. मात्र त्यासाठी वेळीच नियोजन करणे गरजेचे होते. बहुतेक चेंगराचेंगरीच्या घटनेत बळी गेल्यानंतर सरकार उपाययोजना करणार असेल. सध्या आधुनिकीकरणामुळे वाढलेले व घटलेली प्रवासीसंख्या लगेच कळते. स्थानकाच्या क्षमतेनूसार प्रवासी वाढले असतील तर ज्यांनी स्थानकाच्या या पुलांचे व रस्त्यांच्या विस्ताराचे नियोजन केले आहे. त्यांनी गर्दीचे नियोजन विस्ताराच्या कामापूर्वीच करणे गरजेचे होते. पादचारी पुलाची क्षमता तातडीने उभारणे आधुनिकीकरणात काही नवीन बाब नाही. नवीन पनवेल गाठण्यासाठी स्थानकापुढील इतर मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेरुळ ओलांडणे हे त्याहून जास्त सूरक्षेचे वाटते.

राजेंद्र सूर्वे, नवीन पनवेल, प्रवासी
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel railway station crowd on stairs viral video fear of stampede css