पनवेलजवळील रसायनी परिसरात एका कंपनीतून वायूगळती झाल्याने १०० पक्षी, २८ वानरं आणि ४८ माकडांचा मृत्यू झाला आहे. संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी आता केली जात असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

कर्नाळा किल्ला आणि पाताळगंगा परिसरातील गावांजवळ माणिकगड किल्ल्याच्या डोंगररांगा आहेत. या जंगलात भेकर, रानडुक्कर, माकड, ससा, मुंगूस, घोरपड, मोर व इतर वन्य प्राणी आणि पक्षी आढळतात. जंगल परिसरातील माकड व वानर अन्नाच्या शोधासाठी जंगलातून खाली उतरून वस्तीत येतात.

पाताळगंगा परिसरातील एचओसी कंपनीतून बुधवारी रात्री ९.४५ वाजता मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली होती. या वायुगळतीत १०० पक्षी, २८ वानरं आणि ४८ माकडांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली असून कंपनी प्रशासनाने जेसीबीच्या मार्फत खड्डे खोदुन प्राणी -पक्षी आत गाडले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कंपनी परिसरात वन अधिकारी पाहणी करण्यासाठी जात असताना कंपनी प्रशासनाने त्यांना आत येण्यास मज्जाव केल्याचे सांगितले जाते. आता खड्डे खोदून आत गाडलेल्या प्राण्यांचे पंचनामे करण्यात येतील व कंपनी प्रशासनाला कारवाईला सामोरे जावे लागेल अशी माहिती वनाधिकारी देसले यांनी दिली.

Story img Loader