लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : थंडीची चाहूल लागताच पनवेलमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे, धुलिकणांच्या त्रासामुळे श्वसनविषयक आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पालिकेच्या दवाखान्यातून मोफत उपचार केले जात असले तरी खासगी दवाखान्यातील ओघही कमी झालेला नाही. दरम्यान, पालिकेने सर्व दवाखाने आता पूर्णवेळ म्हणजेच सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवले असल्याचे रुग्णांना दिलासा मिळत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्राजवळ तळोजा परिसरात प्रदूषित कारखाने आणि मोठ्या प्रमाणात दगड खदाणी आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम या परिसरात सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धुलिकण पनवेलच्या हवेमध्ये असल्याने पनवेलच्या दूषित हवेमुळे श्वसनाशी संबंधित आजाराच्यचा रुग्णांची वाढत आहे. पनवेलमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तोंडरे आणि कळंबोली या परिसरात हवेतील गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्र उभारले आहे. तळोजा परिसरातील तोंडरे गावातील या यंत्रातून हवेतील गुणवत्ता पी.एम. २.५ चा स्तर ११४ पर्यंत नोंदविला जात आहे. मागील वर्षभऱात पालिकेच्या विविध दवाखान्यांमध्ये सात दिवसांपेक्षा कमी वेळेपर्यंत ताप राहीलेल्या १८,४९१ रुग्णांची नोंद झाली. तर सात दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असलेल्या रुग्णांची संख्या ३,३२८ एवढी नोंदविली गेली. तसेच मागील वर्षभरात सात दिवसांपेक्षा कमी काळ खोकला असलेल्या रुग्णांची संख्या ११,२६४ होती तर सात दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्या रुग्णांची संख्या ४,२८६ नोंदविली गेली.

आणखी वाचा-औद्योगिक पट्टयातील हिरवाई धोक्यात? वनराई असलेल्या भूखंडविक्रीस पर्यावरणप्रेमींचा विरोध

मागील वर्षीपेक्षा यावेळी पालिका क्षेत्रात पालिकेच्या दवाखान्यांची संख्या २६ वर पोहचली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवर उपचार घेणा-या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. हे वर्ष संपण्यासाठी अजून महिना शिल्लक असेपर्यंत पालिकेच्या २६ विविध दवाखान्यांमध्ये आजारावरील उपचारासाठी येणा-या रुग्णांची संख्या ५,३८,९९० वर पोहचली आहे. मागील वर्षी ३,०८, ३६८ रुग्णांनी पालिकेच्या दवाखान्यात उपचार घेतले होते. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे यंदा ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आतापर्यंत नोंदविले गेले आहेत. यावेळी सात दिवसांपेक्षा कमी दिवस ताप असलेले रुग्ण मागील वर्षीपेक्षा दुप्पटीने जास्त आढळले आहेत. यंदा ३८,१५८ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात दिवसांपेक्षा अधिक काळ ताप असलेल्या रुग्णांची संख्या ५,०८० नोंदविली गेली आहे. तसेच यंदा सात दिवसांपेक्षा कमी दिवस खोकला असलेले रुग्ण १७,३५१ तर सात दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असलेले रुग्ण ३,६५३ एवढे आढळले आहेत.

दरम्यान, पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने यापूर्वी साथरोगापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी घरोघरी जनजागृतीची पत्रके वाटली आहेत. संसर्ग आजार असलेल्या रुग्णांनी प्रवास टाळणे, गर्दी टाळणे, सतत हात धुणे, ताजे घरातील अन्न खावे ही त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

आणखी वाचा-उरण लोकल, अटल सेतूमुळे मोरा-मुंबई जलवाहतुकीवर परिणाम

ताप, सर्दी, खोकला या रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिकेच्या २६ दवाखान्यांमध्ये नोंदविले गेले असले तरी हे सर्व दवाखाने पुर्णवेळ सूरु असल्याने यामध्ये रुग्णांचा उपचार घेणा-या रुग्णांचा ओघ वाढल्याने ही संख्या जास्त वाटत असेल. रुग्णांनी प्रवासावेळी मुखपट्टी बांधल्यास ते योग्य राहील. सर्दी, खोकला व ताप असलेल्या रुग्णांनी पालिकेने प्रत्येक वसाहतीमध्ये तसेच ग्रामीण भागात सुद्धा पालिकेचे दवाखाने सुरू केले आहेत. दोन पाळ्यांमध्ये तेथे डॉक्टर व आरोग्यसेविका उपलब्ध आहेत. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. -डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पनवेल पालिका

Story img Loader