कळंबोली सर्कल-खांदा ‘मार्ग रुंद करा, प्रवाशांचा जीव वाचवा’ खांदेश्वर पोलिसांची मोहीम
सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल ते खांदा वसाहतीचा मार्ग रुंद करा आणि प्रवाशांचा जीव वाचवा, अशी मोहीम वाहतूक पोलीस आणि खांदेश्वर पोलिसांनी हाती घेतली आहे. या महामार्गावर मागील तीन वर्षांत सहा मोठे अपघात घडले, त्यामध्ये दोघांनी आपले प्राण गमावले तरीही या मार्गाचे रुंदीकरणाविषयी प्रशासन गंभीर होत नसल्याची खंत पोलीस विभागाने व्यक्त केली आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील खांदेश्वर ही वसाहती २५ वर्षांपूर्वी सिडकोने वसविली आहे. वसाहतीच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या सिग्नलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे खांदेश्वरवासीयांसह महामार्गावरील वाहनचालक हैराण झाले आहेत. अतिक्रमण काढण्यापासून ते नवीन रस्त्याचे रुंदीकरण याची जबाबदारी प्रशासन उचलण्यास तयार नाही. यापूर्वीही या महामार्गावर कलिंगडनाक्याला खेटून नर्सरीचे दुकान थाटलेल्या व्यक्तीला एसटी बसने उडवले होते. त्या वेळी रुंदीकरणाचा प्रश्न प्रकाशझोतात आला. त्यानंतर मोठा अपघात न घडल्याने प्रशासन ढिम्म आहे. खांदेश्वर येथील महामार्गाला असे किती बळी दिल्यावर येथील रुंदीकरणाचे काम प्रशासन हाती घेईल, याच्या प्रतीक्षेत पोलिसांसह सामान्य वाहनचालक आहेत. पनवेलहून निघालेला हाच मार्ग मुंब्रा शहराला जोडतो. यादरम्यान आयआरबी कंपनीचा टोल रोहिंजण येथे आहे. विशेष म्हणजे या टोलनाक्यातून सिडको वसाहतींना सूट नाही. ज्या प्रशासनाच्या मालकीचा हा रस्ता आहे. त्यांच्याकडून कोणतीही दखल या मार्गाची घेतली जात नाही.
रुंदीकरणानंतर मार्गाला संरक्षकपट्टीची सूचना
खांदेश्वर सिग्नल येथील मार्गाचे रुंदीकरण करून या सपूर्ण मार्गाला संरक्षकपट्टी मारल्यास तात्पुरती वाहतूक कोंडी आणि अपघात टळतील, असे लेखी पत्राद्वारे वाहतूक पोलिसांनी या रस्त्यांची देखभाल करणाऱ्या आयआरबी कंपनीला दिले आहे. वाहतूक पोलिसांनी खांदेश्वर सिग्नलजवळची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावरून खांदेश्वर रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठीचा उजव्या हाताचा वळसा रस्ता बंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप जगदाळे यांनी दिली. खांदेश्वर शहरातील महामार्गावरील बसथांब्यांची जागा हलविल्यास वाहतूक कोंडी कमी होईल याबाबत प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक पोलीस प्रयोग करून पाहणार आहेत. तसे झाल्यास प्रवाशांना शहराच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर येऊन बसथांब्याकडे जाण्याची सवय करून घ्यावी लागेल. जगदाळे यांनी सिग्नलमध्ये काही बदल केले आहेत. प्रत्यक्ष यूटर्न बंद करत वाहनचालकांना शिस्त लागावी या हेतूने हे बदल करण्यात आले आहेत. खांदा कॉलनीची ओळख असलेला कलिंगडनाका याच महामार्गाच्या रुंदीकरणाची खरी अडचण आहे. त्यावर कोणताही ठोस निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही.
अपघातांनंतरही मार्गाच्या रुंदीकरणाबाबत प्रशासन उदासीन
सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल ते खांदा वसाहतीचा मार्ग रुंद करा आणि प्रवाशांचा जीव वाचवा, अशी मोहीम वाहतूक पोलीस आणि खांदेश्वर पोलिसांनी हाती घेतली
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 08-09-2015 at 07:14 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel roads news