जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ कारभाराचा भरुदड

रायगडचे जिल्हाधिकारी शीतल उगले-तेली यांना गेल्या आठवडय़ात उत्तम प्रशासनाबद्दल सरकारने राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्कार देऊन गौरविले. मात्र याच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे पनवेलच्या शैक्षणिक विभागांकरीता मागील वर्षी आलेला पाच कोटी रुपयांची विशेष निधी परत गेला आहे. मुख्यमंत्री निधीतून आलेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयाने नमुण्यामधील तक्त्यानूसार भरून सरकारला दिला असता तर हे पाच कोटी रूपये पनवेल पालिकेच्या १० विद्यालयांची शोभा वाढली असती असे बोलण्याची वेळ पनवेलकरांवर आली आहे.

गतिमान सरकार अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे, मात्र पनवेल महापालिकेच्या अखत्यारीतील शाळांची अवस्था पाहिल्यावर दिव्याखाली अंधारच असल्याचे दिसते.

येथील महापालिकेच्या १० विद्यालयांपैकी पाच विद्यालयांत रंगरंगोटीपासून करणे आणि विद्यार्थ्यांना विविध सोयी-सुविधा देणे यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी सरकारने दिला होता. मात्र हा निधी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून पनवेल पालिकेला मिळणार असल्यामुळे मागील आर्थिक वर्षांत त्याचा विनियोग गतिमान प्रशासनाला करताच आला नाही.

हा निधी मिळण्यासाठी त्याचा विनियोग कशा प्रकारे करणार याची माहिती सरकारला विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक होते. मात्र ही माहिती चुकीच्या पद्धतीने सरकापर्यंत पोहोचली आणि निधी हातचा गेला.

गेल्या आर्थिक वर्षांत निधी न वापरल्यामुळे सरकारने या आर्थिक वर्षांत हा निधी पुन्हा देण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे पनवेल पालिकेच्या शाळांची अवस्था सध्या रायगड जि.प. शाळांपेक्षा बिकट आहे.

Story img Loader