पनवेल: पनवेल तालुक्यातील १०,५५८ विद्यार्थ्यांपैकी १०,३२८ विद्यार्थी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले असून तालुक्यातील ९७.८२ टक्के निकाल लागल्याची माहिती तालुका गट शिक्षणाधिका-यांनी दिली. पनवेल तालुक्यातील ५९ महाविद्यालयांमधील १०,५५८ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. मंगळवारी दुपारी एक वाजता बारावी परीक्षेच्या ऑनलाईन निकालाकडे शेकडो विद्यार्थी व पालकांचे लक्ष्य लागले होते.
हेही वाचा : पनवेलमध्ये ३३ अवैध फलकांचे तोडकाम सुरू
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालये आणि शाळा पनवेल तालुक्यात असल्याने येथे पालकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील आर.एस.एस. आर्टस, व्ही. के. हायस्कूल, सी. के.ठाकूर ज्युनिअर कॉलेज, महात्मा एज्युकेशन सोसायटी, एन.एन. पालिवाल ज्युनिअर कॉलेज, कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय या सहा महाविद्यालयांमध्ये पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती.