मागील वर्षभरापासून पनवेल व नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनचोरीच्या घटना घडल्या असून पनवेल तालुका पोलीसांनी तीन आसनी रिक्षा चोरणा-या दोन चोरट्यांना अटक केल्यावर त्यांनी अनेक चो-या केल्याची कबूली पोलीसांना दिली. १८ फेब्रुवारीला पनवेलच्या ग्रामीण परिसरातून नरेश डुकरे यांची तीन आसनी रिक्षा चोरीस गेली होती. पोलीस व रिक्षाचे मालक हे रिक्षा कुठे सापडते याचा मागोवा घेत होते. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यावर पोलीसांच्या पथकाला चोरीस गेलेली रिक्षा मुंब्रा (कौसा) येथे दिसली.
हेही वाचा >>> उरण पनवेलच्या रस्त्यावरील वाढत्या प्रदूषणा विरोधात उरण सामाजिक संस्थेची निदर्शने
पोलीसांनी या प्रकरणी मुंब्रा येथून २५ वर्षीय फरान मो. हनीफ बुबेरे, २८ वर्षीय वसीम उर्फ सोनू मेहमूद आलम शेख याला ताब्यात घेतल्यावर या दोघांनी लोखंडी सळई आणि डायघर येथून तीन आसनी रिक्षा चोरी केल्याचे समजले. या दोन्ही संशय़ीत चोरट्यांकडून पोलीसांना एक लाख ८९ हजार २६१ रुपयांचा माल जप्त करण्यात यश मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांनी दिली. या प्रकरणातील अटकेत असलेला संशयीत आरोपी बुबेरे याच्यावर यापूर्वी सुद्धा १२ विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलीसांनी सांगीतले. या गुन्ह्यांमध्ये कल्याण येथे विना परवाना शस्त्र वापरणे, लुटीचा प्रयत्न करणे, खालापुर पोलीस ठाण्यात जनावरांची बेकायदा वाहतूक कऱणे, पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, फसवणूक, तळोजा व नागोठणे पोलीस ठाण्यात चोरी हे गुन्हे दाखल असून संशयीत आरोपी वसीम याच्यावर सुद्धा तळोजा व पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.