पनवेल ः रोडपाली येथील फुडलॅंड कंपनीसमोरील उड्डाणपुलावरुन भरधाव येणा-या ट्रकने शनिवारी सायंकाळी ३२ वर्षीय टोल वसूल करणा-या कर्मचा-याला चिरडले. दोन वाहनांमध्ये हा कर्मचारी चिरडला गेला. घटनेनंतर धडक देणारा ट्रकचालक फरार झाला होता. सोमवारी ट्रकचालक कळंबोली पोलीस ठाण्यात हजर झाला. संदीप मिश्रा असे या मृत कर्मचा-याचे नाव आहे. भवधाव वेगाने ट्रक चालविल्याबद्दल कळंबोली पोलीस कारवाई करत आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोडपाली येथील फुडलॅंड कंपनीसमोरील उड्डाणपुलावर सायंकाळच्या सूमारास नेहमी वाहतूक कोंडी असते. तळोजा औद्योगिक वसाहतीमधून सायंकाळच्या सूमारास कंपन्यांमधून एकाचवेळी सूटणा-या वाहनांमुळे ही कोंडी होते. या पुलावरुन विरुद्ध दिशेने सुद्धा वाहने पळविली जातात. नवी मुंबई वाहतूक पोलीसांच्या मागणीनंतर पनवेलमधील वाहतूक कोंडीवर पोलीसांना सहकार्यासाठी पालिकेने वार्डनची नेमणूक वाहतूक नियमनासाठी केली आहे. रोडपाली चौकात हे वार्डनही पोलीसांकडून तैनात केले असतात. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सूमारास संदीप मिश्रा हे एका अवजड वाहनाकडील टोलची पावती तपासत असताना फुडलॅण्ड कंपनीसमोरील उड्डाणपुलावरुन आलेल्या ट्रकने संदीपला धडक दिली.

हेही वाचा…संदीप नाईकांच्या बंडखोरीमुळे भाजपचा बेलापूरमध्ये उमेदवारापेक्षा चिन्हावर भर

या धडकेमध्ये संदीप दोन्ही ट्रकच्या मधोमध चिरडून घटनास्थळीच तो ठार झाला. टोलच्या इतर कर्मचा-यांनी संदीपला महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला होता. सोमवारी दुपारी ट्रकचालक बिलाल अहमद हजरत अली याला पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलीसांनी बिलाल अली याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे १२५ (ब), २८१, १०६ (१), महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ प्रमाणे १८४, १३४, १७७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel toll collector killed by speeding truck in roadpali on saturday sud 02