जेएनपीटी बंदचा इशारा
उरण-पनवेल परिसरातील रस्त्यावरील जड तसेच वाढत्या वाहनांमुळे येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, ही आता रोजचीच डोकेदुखी झाली असून ही समस्या येत्या गणेशोत्सवाच्या कालावधीत दूर करावी, अन्यथा १५ सप्टेंबरला रस्त्यावर उतरून जेएनपीटी परिसरातील कामकाज बंद पाडण्याचा इशारा उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी गुरुवारी दिला.
वाहतूक कोंडीवरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी जेएनपीटी विश्रांतीगृहात विविध आस्थापनांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जेएनपीटी तसेच बंदरातील जीटीआय, दुबई वर्ल्ड पोर्ट व या बंदरावर आधारित उद्योगातील जड वाहनांमुळे जासई नाका, गव्हाण फाटा तसेच धुतूम परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यात आले. या मार्गावर प्रवासी व हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका (सव्‍‌र्हिस रोड) नसल्याने दररोज अपघात होत आहे. या अपघातात मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. तर जेएनपीटी परिसरात हजारो कंटेनरयुक्त जड वाहने तीन ते चारच्या रांगेत उभीच राहत असल्याने उरणमधील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या.
जेएनपीटी तसेच येथील खासगी बंदर, बंदरावरील आधारित उद्योग, उरण व जेएनपीटी परिसरातील वाहतूक शाखा यांच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत हजेरी लावली होती. यावेळी वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी तीनही बंदरांनी वाहतूक विभागासाठी ६० सुरक्षा रक्षक पुरविण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी जेएनपीटीचे माजी विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील, गोपाळ पाटील, काँग्रेसचे जे.डी.जोशी, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, संतोष पवार आदी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीत सिडको, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आदी रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या आस्थापनांनाही गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजविण्याची सूचना आमदारांनी यावेळी केली.

Story img Loader