पनवेल : राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेमके उमेदवार कोण, असा प्रश्न मतदारांना पडल्याने मतदार गोंधळात आहेत. परंतू सामान्य मतदारांप्रमाणे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी येणा-या नेतेमंडळींचा सुद्धा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. गुरुवारी खा. निलेश लंके यांची शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी कामोठे येथे सभा होती. या सभेत वेळेअभावी खा. लंके येऊ न शकल्याने त्यांनी मोबाईल फोनवरुन सभेला संबोधित केले. परंतू काही वेळाने खा. लंके यांनी पनवेलच्या ठाकरे गट सेनेच्या लीना गरड यांना सुद्धा शुभेच्छा दिल्याची छायाचित्र पनवेलच्या मतदारांपर्यंत मोबाईलवरुन पोहचविण्यात आले. महाविकास आघाडीतील दोन उमेदवारांना एकाच दिवशी खा. लंकेंच्या शुभेच्छा दिल्याने नेतेमंडळींमध्ये सूद्धा गोंधळ कायम असल्याचे चित्र दिसले.
हेही वाचा : महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
गुरुवारी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी कामोठे येथे खा. निलेश लंके हे येणार होते. मात्र त्यांनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याने भव्यसभेकडे पाठ फीरवली आणि मोबाईल फोनवरुन सभेला संबोधित करताना बाळाराम पाटील यांचा प्रचार करत शिट्टीला साथ देण्याचे आवाहन केले. मोबाईलवरुन सभेला संबोधित केल्याचे ध्वनीचित्रफीत काही वेळातच पनवेलच्या मतदारांच्या मोबाईल फोनवर पसरवली गेली. त्यानंतर काही वेळात महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लीना गरड यांच्या समर्थकांनी खा. निलेश लंके यांनी गरड यांची स्वता भेट घेऊन त्यांनाही निवडणूकीसाठी शुभेच्छा दिल्याची छायाचित्र पनवलेच्या मतदारांच्या मोबाईल फोनवर गरड यांच्या समर्थकांकडून पसरविण्यात आली. अवघ्या पाच दिवसांवर विधानसभा निवडणूक आली आहे. महाविकास आघाडीतील शेकाप आणि ठाकरे सेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडीतील गोंधळ कमी होण्यापेक्षा निवडणूकीची वेळ जवळ येत असताना गोंधळ अधिक वाढत चालला आहे. भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांची लढत महाविकास आघाडीच्या लीना गरड आणि बाळाराम पाटील या दोन्ही उमेदवारांविरोधात आहे.