सततच्या घरफोडय़ांनी घाबरलेल्या पनवेलमधील महिलांचा पोलीसांवर प्रश्नांचा भडिमार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन पनवेल वसाहतीत गेल्या काही दिवसांत वाढलेल्या घरफोडय़ांनी रहिवाशांची झोप उडवली आहे. यासंदर्भात सोमवारी रात्री खांदेश्वर पोलीस अधिकाऱ्यांसोबत रहिवाशांची बैठक झाली. या वेळी रहिवाशांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत आक्रमक झालेल्या महिलांनी पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केला. खिडकीचे गज वाकवून घरात शिरलेल्या चोरांच्या धारिष्टय़ामुळे एका महिलेने तर आता घरात राहण्याची भीती वाटत असल्याची भावना अधिकाऱ्यांसमोर बोलून दाखवली. पनवेलमधील सेक्टर ९ मधील शिवशंभो इमारतीसमोरील रस्त्यावर ही बैठक झाली. २०१५ मध्ये खांदेश्वर पोलीस ठाण्यात २८ घरफोडय़ा आणि २८ वाहनचोऱ्यांची नोंद आहे. त्यानंतर गेल्या आठवडय़ात घरफोडी झाली. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांच्या कारभाराविषयी जाब विचारला. पोलीस गस्तीवर असताना चोऱ्या होतातच कशा, अशा शब्दांत काही रहिवाशांनी जाब विचारला.

या भागात मंगळसूत्र चोरीही वाढली आहे. दुचाकीवरून भरधाव वेगाने आलेल्या चोरटय़ांच्या टोळ्या रस्त्यावर चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच दागिने हिसकावून पोबारा करीत असल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याबाबत पोलिसांनी काही उपाययोजना केल्या आहेत की नाही, याचाही रहिवाशांनी जाब विचारला. दुचाकी चोरण्याच्या प्रकारामध्येही वाढ झाली आहे. यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. त्यामुळे नवीन पनवेल नागरिकांसाठी सुरक्षित कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बैठकीला समीर ठाकूर, संतोष शेट्टी, संगीता कांडपाळ हे उपस्थित होते.

सायरन-शिटी बंद

चोरीबाबत रहिवाशी पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी जातात, पण पोलीस ती नोंदवून घेण्यास एकतर टाळाटाळ करतात वा प्रक्रियेत दिरंगाई करतात, असा थेट आरोप रहिवाशांनी पोलिसांवर केला. दप्तरी गुन्ह्य़ांची कमी नोंद दाखवण्यासाठी पोलीस असे करीत असल्याचे एका रहिवाशाने म्हटले. पोलिसांनी रात्री गस्तीच्या वेळी शिटी वाजवण्याची आणि सायरन वाजविण्याचे उपक्रम सुरू केला होता; परंतु चोरांनी शिटीचा आवाज ऐकून चोरीचे लक्ष्य असलेल्या परिसरातून पळ काढण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी चाल बदलली आणि चोरांना अचानक पकडण्यावर भर दिला की काय, यावर रहिवाशांमध्ये शंकांना उधाण आले होते.

खांदेश्वर पोलीस ठाण्यात सध्या अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे सायरन गस्त बंद केली. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांविषयी गैरसमज करून घेऊ नये. पोलिसांवर विश्वास ठेवावा. घरफोडय़ा करणाऱ्या टोळ्या काही दिवसांतच कोठडीत असतील.

अमर देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खांदेश्वर. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel woman scared to stay at own house due to burglary