उपजिल्हा रुग्णालय रखडले; अंतिम मुदत संपूनही वर्षे उजाडले

सीमा भोईर, पनवेल</strong>

२०१८ च्या जानेवारीत पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाची सेवा सुरू करू, असे आश्वासन खुद्द आरोग्यमंत्र्यांनी देऊनही २०१९चा जानेवारी महिना आला तरी रुग्णालय सुरू झाले नाही. अजूनही इमारतीची कामे सुरू असून आरोग्य विभागाकडे हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे आणखी सहा महिने पनवेलकरांना या सेवेची वाट पाहावी लागणार आहे.

पनवेल परिसरात एकही मोठे शासकीय रुग्णालय नाही. मोठय़ा आजारांवर उपायांसाठी रुग्णांना थेट मुंबई गाठावी लागत आहे. शवविच्छेदन करण्यासाठी पालिकेजवळ एक छोटं शवागृह आहे, मात्र बऱ्याचदा न्याय वैद्यकीय अहवालासाठी शव जे.जे.रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी या उपजिल्हा रुग्णालयाची नितांत गरज आहे.

पनवेलमध्ये १०० खाटांचे हे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात येत आहे. मात्र शासनाकडून निधीसाठी होत असलेल्या विलंबामुळे ते रखडले आहे. सद्य:स्थितीत कोळीवाडय़ात ग्रामीण रुग्णालय सुरू असून पनवेलची वाढती लोकसंख्या पाहता ही सेवा अपुरी पडत आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १३ कोटी ८३ लाख ९८ हजार रकमेच्या अंदाजपत्रकाला आरोग्य विभागाकडून मान्यता मिळाली. तेव्हापासून रडतखडत हे काम सुरू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केल्यानंतर २०१८ च्या जानेवारी महिन्यात हे रुग्णालय खुले करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिले होते. असे असले तरी अद्यापही या रुग्णालयाच्या इमारतीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरूच आहेत. यामुळे पनवेलकरांकडून नाराजी व्यक्त होत असून लवकरात लवकर  रुग्णालय खुले करावे, अशी मागणी होत आहे. रुग्णालयाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू असून बरेचसे बांधकाम पूर्णत्वास आले असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

रुग्णालय अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केले नाही. काम पूर्ण होण्यास अजून महिन्याचा कालावधी लागणार आहे. इतर कामे सुरू आहेत. हस्तांतरण झाल्यानंतर साहित्य खरेदी, कर्मचारी भरती होईल.

-डॉ. नागनाथ येमपल्ले, वैद्यकीय अधीक्षक

उपजिल्हा रुग्णालयाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. महिनाभरात उर्वरित काम संपेल. सद्य:स्थितीत ईटीबी प्लांट व काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.

– एस. एम. कांबळे, सह. अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

Story img Loader