विकास महाडिक
उन्हाळ्यातील पाणी संकटावर उपाययोजना ; तळोजाकरांची आज सिडकोला धडक
शहराच्या चारही बाजूने सहा धरणांत मुबलक पाणी असताना पनवेलकरांच्या घशाला डिसेंबरमध्येच कोरड पडण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलकरांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तळोजा वसाहतीत तर पाण्याची भीषण टंचाई सुरू असून मंगळवारी तळोजाकर सिडकोला धडक देणार आहेत.
राजकीय अट्टहासापोटी रातोरात नगरपालिकेमधून महापालिकेत रूपांतरित झालेल्या पनवेल पालिकेला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यात पाणी समस्याने डिसेंबरपासूनच डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. तीन किलोमीटरची नगरपालिका थेट ११० किलोमीटरची झाल्याने रहिवाशांना पिण्याचे पाणी कमी पडू लागले आहे. पालिका क्षेत्राला सध्या २४० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना त्यात १०० दशलक्ष लिटर पाणी तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे तळोजासारख्या नवीन उपनगरातील रहिवाशांना पाण्यासाठी रातभर जागण्याची वेळ आत्ताच आली आहे. या उपनगराला आठ दशलक्ष पाण्याची आवश्यकता असताना केवळ अडीच ते तीन दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन नसताना सिडकोने या भागात २५ हजार घरांच्या महागृहनिर्मितीची घोषणा केली आहे. ते कमी म्हणून काय राज्य शासनाने आणखी ९० हजार घरे बांधण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. त्यामुळे मूळ पनवेलकरांच्या तोंडचे पाणी विस्तारीत नागरिकरणाने पळविले आहे. विमानतळ, रेल्वे यासारख्या सेवामुळे पनवेलला राहण्यास जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांचे मात्र पाण्याअभावी स्वप्न भंग होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी पनवेलमधील पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले होते. पालिकेला नवी मुंबई पालिकेकडे पिण्याचे पाणी टॅंकरने मागण्याची वेळ आली होती. नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणाची जलवाहिनी याच पनवेल शहराच्या पश्चिम बाजूकडून जात आहे. महाराष्ट्र जीनव प्राधिकरण, मोरबे, हेटवणे, एमआयडीसी आणि स्वत:च्या देहरंग धरणातून पनवेलकरांची तहाण भागविणाऱ्या पालिकेने भाविष्यातील पाणीटंचाईची चाहूल आत्तापासून ओळखून उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत पालिका सध्या होणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात करून एक दिवसआड पाणीपुरवठा करणार आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला
पनवेलच्या पूर्वे, पश्चिम आणि दक्षिण बाजूस पाण्याचे अनेक स्रोत आहेत. यात मोरबे, हेटवणे, बाळगंगा, रानसई, पाताळगंगा नदी, मोर्बे या स्रोतांचा समावेश आहे. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती पनवेलकरांची झाली आहे. ब्रिटिश काळात स्वत:चे धरण बांधणाऱ्या नगरपालिकेवर ही वेळ आली आहे.
सिडकोला पाणी नियोजन जमले नाही
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम तर प्रगतिपथावर आहे. उरणपर्यंत जाणारी रेल्वे अध्र्या मार्गावर नेऊन ठेवली आहे. गोल्फ कोर्स मेट्रो कॉर्पोरेट पार्कसारखी आधुनिक जग निर्माण करण्याच्या धुंदीत असलेल्या सिडको प्रशासनाला पाण्याचे नियोजन जमलेले नाही.
पनवेलमध्ये भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यात एक दिवसआड पाणीपुरवठा ही एक प्राथमिक उपाययोजना असून शहरातील तलावांचे पाणी संरक्षित केले जाणार आहे. त्याचबरोबर नऊ टॅंकर तयार ठेवण्यात आले असून भविष्यात ही संख्या वाढणार आहे. पाणी समस्येवर मात करण्यासाठी दीर्घ उपाययोजना करण्यात येत असून त्याला दोन अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे.
गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका