नवी मुंबई : नेरुळ येथील एका शाळेत चार वर्षांच्या बालकावर बसचालकाकडून यौन शोषण केल्याचा आरोप करत सलग दुसऱ्या दिवशी पालकांनी निदर्शने केली. या आंदोलनाला राजकीय पाठबळ असल्याने शाळेभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी चालकाला पोस्कोअंतर्गत ताब्यात घेतले आहे. मात्र शाळा व्यवस्थापनाच्या भूमिकेवर पालकांचा अजूनही संताप आहे.

चार वर्षांच्या मुलावर स्कूल बसचालकाने अत्याचार केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. संतप्त पालकांनी शाळेसमोर शांततापूर्ण निषेध मोर्चा काढला. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणीही पालकांनी केली आहे. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीमुळे ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ आरोपींवरच नव्हे तर मुख्याध्यापक व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.

या घटनेत आरोपी चालकाची वैद्यकीय तपासणी २४ तासांनंतर करण्यात आल्याने आंदोलक संतापले असून त्यांनी शाळेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये कडक नियम लागू करण्याची मागणीही पालकांनी केली आहे.