उरण : उरण एज्युकेशन सोसायटी या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या विद्यालय प्रशासनाने चालविलेल्या मनमानी विरोधात पालकांनी जाब विचारत निषेध केला आहे. सोमवारी शाळेच्या व्यवस्थापना विरोधात एक होत पंचायत समितीच्या गट शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला पालकांनी व्यवस्थापनाला त्यांच्या कडून पालकांना विश्वासात न घेता घेण्यात आलेल्या आर्थिक निर्णयाचा जाब विचारत हा निषेध नोंदविला.
मागील अनेक वर्षांपासून पालक संघटनेचा संघर्ष सुरू आहे. पालकांना अंधारात ठेवून विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या ओळखपत्राच्या नावाखाली ५५० रुपये घेण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात पालकांनी उरण गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. गटशिक्षण अधिकारी प्रियांका पाटील यांनीही तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान सातत्याने करण्यात येणाऱ्या भरमसाठ फी वाढीमुळे पालकांना ती भरणे अवघड जात आहे. तर वाढविण्यात आलेली फी सक्तीने वसूल केली जात आहे.
नव्याने आता ओळखपत्रासाठीची जादाची फी वसुल करण्यात असल्याचे मत पालक संघटनेच्या उपाध्यक्षा ॲड.प्रतिभा भालेराव यांनी व्यक्त केले आहे. विद्यालयात आलेल्या व बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याची फी आकारली जात आहे.यातील ६५ टक्के फी पालकांनी भरली आहे.मात्र शाळेची नाहक बदनामी करण्याचे काम काही राजकीय संघटना करीत असल्याचे मत उरण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन यांनी दिली आहे.