नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांना मोठी मागणी असून या शाळातील प्रवेशासाठी पालक गर्दी करत आहेत. सीवूड्स सेक्टर ५० येथील शाळा क्रमांक ९३, कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ व सारसोळे येथील शाळा क्रमांक ९८ येथील शाळांमध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते इयत्ता ८ वी च्या वर्गातील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात आली. या शाळांमधील प्रवेश निःशुल्क असल्याने प्रवेशासाठीचे अर्ज घेण्यासाठी पहिल्याच दिवशी पालकांची गर्दी केली.
सीवूड्स, कोपरखैरणे आणि सारसोळे या तिन्ही ठिकाणच्या शाळांमध्ये एकूण ४१५ प्रवेश दिले जाणार आहेत. आवश्यक प्रवेशांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने अर्ज निवडण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी शाळेपासून १ कि.मी. च्या आत अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. वयाची अट पूर्ण असणे आवश्यक आहे. गुरुवारपासून अर्ज स्वीकृती सुरु झाली. १२ मार्च २०२५पर्यंत अर्जांची मुदत आहे. त्यामुळे अर्ज घेण्यासाठी पालिकेच्या तिन्ही सीबीएसई शाळेमध्ये पालकांनी गर्दी केली होती.
नवी मुंबई महापालिकेच्या सीवूड्स, सारसोळे तसेच कोपरखैरणे येथील नर्सरी तसेच इतर वर्गातील प्रवेशसाठी आज अर्ज वाटप सुरु करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पालकांनी अर्ज घेण्यासाठी गर्दी केली होती. – सुलभा बारघरे, विस्तार अधिकारी, नवी मुंबई महापालिका
प्रवेश मर्यादा
नेरुळ शाळा क्रमांक ९३ – १८२
सारसोळे शाळा क्रमांक ९८ – १०२
कोपरखैरणे शाळा क्रमांक ९४ – १३१