नवी मुंबई महापालिकेची कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सहामाही परीक्षा देखील अंतिम टप्प्यात आली असून, अजूनही शिक्षक उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे पालकांनी शिक्षणाधिकारी आणि आयुक्तांची भेट घेऊन दिवाळीपर्यंत शिक्षक भरती करा, अन्यथा महापालिका मुख्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा अल्टिमेटम पालकांनी शिक्षण विभागाला दिला आहे.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

महानगरपालिकेची सीबीएससी शाळा सुरू करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातील प्रथम महापालिका ठरली आहे. मागील पाच वर्षांपासून नेरुळ आणि कोपरखैरणे येथे ही शाळा सुरू आहे. दिवसेंदिवस या शाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असून पटसंख्या वाढत आहे . नेरुळ येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुरेसे शिक्षक उपलब्ध आहेत. मात्र कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ मध्ये शिक्षकांविना विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाताहत सुरू आहे. नियमानुसार ३०-४० पटसंख्या असलेल्या वर्गाला एक शिक्षक असणे गरजेचे आहे. १२५० विद्यार्थ्यांना किमान ३० शिक्षक अनिवार्य आहेत. मात्र सध्या १२५० विद्यार्थ्यांची मदार अवघ्या १० शिक्षकांवर आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांच्या प्रतिक्षेत असलेल्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळी असून दिवाळीपर्यंत शिक्षक भरती झालीच पाहिजे अन्यथा नाइलाजास्तव उग्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. दिवाळीपर्यंत शिक्षक भरती पूर्ण होईल व विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षक उपलब्ध होतील अशी माहिती महापालिका अतिरिक्त शिक्षण अधिकारी योगेश कडूसकर यांनी दिली आहे.

Story img Loader