कृषी उत्पन्न बाजार, रेल्वे स्थानकांच्या वाहनतळांत सोय
मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची मोठी भिस्त नवी मुंबईवर आहे. मोर्चेकऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. पनवेल ते वाशीदरम्यान रेल्वे स्थानकांबाहेर असलेली मोकळी जागा व मैदाने यांचा उपयोग पश्चिम महाराष्ट्र व कोकणातून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी करण्यात आला आहे. या स्थानकांबाहेर वाहने उभी करून मोर्चेकरी हार्बर रेल्वे मार्गावरून रे रोडपर्यंत प्रवास करणार आहेत. मुंबईत होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा उपाय शोधण्यात आला आहे.
९ ऑगस्ट रोजी मुंबईत निघणाऱ्या मराठा मूक मोर्चासाठी १५ ते २० लाख कार्यकर्ते एकटवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात पश्चिम महाराष्ट्र व कोकणाचा मोठा वाटा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमधून येणारी वाहने आणि मोर्चेकऱ्यांची व्यवस्था तुर्भे येथील एपीएमसीच्या कांदा, बटाटा, धान्य आणि मसाला बाजारात करण्यात येणार आहे. त्यांची वाहने आणि सकाळच्या अल्पोपाहाराची व्यवस्था माथाडी संघटनेने केली आहे. या मोर्चात पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या माथाडी कामगारांच्या कुटुंबांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी या शिखर संघटनेने स्वीकारली आहे.
नवी मुंबईच्या पनवेल, खांदेश्वर, कामोठे, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, सीबीडी, वाशी या सर्व रेल्वे स्थानकांबाहेर विस्र्तीण वाहनतळे आहेत. तिथे मोर्चेकऱ्यांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा येणाऱ्या वाहनांमुळेच मुंबईतील पार्किंग व्यवस्था कोलमडून जाणार असल्याने पहाटे नंतर येणाऱ्या वाहनांना नवी मुंबईतील रेल्वे स्थानके हा पर्याय ठेवण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाबाहेर वाहने पार्क करणाऱ्या मोर्चेकरांसाठी काही सामाजिक संस्थांनी पाणी व अल्पोपाहाराची व्यवस्था केली आहे.
नवी मुंबईतून ५० हजार मोर्चेकरी
नवी मुंबईतून ५० हजारांच्या वर मराठा मोर्चेकरी सहभागी होणार आहेत. अण्णासाहेब पाटील यांचे आरक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी कुटुंबासह सहभागी होण्याची साद माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी वाशीतील विविध बाजारपेठांत दिली आहे.
बाजार बंद, पोलिसांच्या रजा रद्द
मोर्चेकऱ्यांची गर्दी विचारात घेता बुधवारी कृषी उत्पन्न बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक विभागाचे ३३० कर्मचारी आणि १५ अधिकारी तैनात असणार आहेत. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता अन्य सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मुंबईतील मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिक नवी मुंबईत येणार असून शहरात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता वाहतूक विभागाने घेतली आहे.
– नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक पोलीस