बेलापूर, नेरुळ परिसरात अस्ताव्यस्त पार्किंग

बेलापूर आणि नेरुळ परिसरातील रस्ते मोठे असले तरी वाढत्या अनधिकृत पार्किंगमुळे रहदारीत अडथळे येत आहेत. पालिकेची पार्किंगसंदर्भातील नियोजनशून्यता याला कारणीभूत आहे. रस्त्याच्या कडेला मोठय़ा प्रमाणात वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यांना अडथळा शर्यत करावी लागत आहे. शिवाय दैनंदिन स्वच्छतेतही समस्या येत आहेत.

शहराच्या काही भागांत वाहने खूप दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी आहेत. पालिकेने त्यापैकी अडीचशे वाहनांवर कारवाई केली आहे. नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने नेरुळ क्षेत्रात रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग, सम-विषम पार्किंग, नो पार्किंग झोनच्या माध्यमातून पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासंदर्भातील सूचना देणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत, मात्र वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मनमानीपणे जिथे जागा मिळेल तिथे गाडय़ा पार्क करतात. नेरुळ सेक्टर-१० गावदेवी बसस्टॉपच्या विरुद्ध बाजूला दुचाकी उभ्या केलेल्या असतात. गावदेवी मैदानाबाहेर वाहने धूळ खात आहेत. नेरुळ भागात शाळांच्या परिसरात रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात. रामलीला मैदानाबाहेर वाहने पार्क केली जातात. कुकशेत गाव सेक्टर-१४ येथेही दुतर्फा पार्किंग केले जाते. सारसोळे गाव, सेक्टर-७ समाधान हॉटेल, गजानन महाराज मैदानाच्या परिसरात पदपथ वाहनांनी व्यापले आहेत. सेक्टर-१० सारसोळे बस डेपोच्या बाहेर रुग्णवाहिका व टॅक्सी उभ्या असतात.

parking-chart

नेरुळ कुकशेत गाव सेक्टर-१४ येथे पदपथांवर, सेक्टर-६ येथील पालिकेच्या खेळाच्या मैदानाबाहेर वाहने उभी करण्यात येतात. सेक्टर-४ गोकुळ पाटील रोड परिसरात नो पार्किंग परिसरात बंद पडलेली वाहने ठेवण्यात आली आहेत. बस थांब्यासमोर वाहने पार्क  केलेली असल्याने थांब्यावर प्रतीक्षा करणाऱ्यांना बस दिसत नाही. डाव्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या बाहेर एमटीएनएल ऑफिसच्या बाहेर नो पार्किंग परिसरात वाहने उभी करण्यात आली आहेत. सेक्टर-१५ मध्ये दुतर्फा पार्किंग केले जाते. सेक्टर-११ भवानी चौक, डी. वाय. पाटील सर्कलच्या चारही बाजूंनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. मंदा म्हात्रे यांच्या गौरव बंगल्याबाहेरील रस्त्यावरही वाहने पार्क केली जातात.

पोलीस आयुक्तालयाबाहेर पार्किंग क्षेत्र नाही, तरीही राजरोस दुतर्फा पार्किंग केले जाते. बेलापूर परिसरात आग्रोळी, बेलापूर, शहाबाज, दिवाळे या गावांतील रस्ते चिंचोळे आहेत. पार्किंगसाठी अधिकृत जागा उपलब्ध नसल्यामुळे इतस्तत: पार्किंग केले जाते. त्यामुळे रस्ता अधिकच अरुंद होतो. एकच मार्गिका असल्याने आणि दोन्ही बाजूंना वाहने उभी करण्यात आल्यामुळे वाहने काढण्यास त्रास होतो. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची चोरीही होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी डिसेंबर २०१६मध्ये नो पार्किंग क्षेत्रात गाडय़ा पार्क केल्याच्या ४९३ व रोड पार्किंगच्या ३,२९४ प्रकरणांत अनुक्रमे १,०७,७०० व ६,५१,१०० रुपयांची दंडवसुली केली.

वाहनचालक सूचना फलक न पाहता कोठेही वाहने पार्क करतात. महापालिकेने पार्किंगचे नियोजन केलेले नाही. लोकांना दंड ठोठावूनही काहीही फरक पडत नाही. मॉल्सबाहेर बेकायदा पार्किंग आढळल्यास व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात येतील.

नितीन पवार, उपायुक्त वाहतूक विभाग

सिडकोने प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या परिसरात वाहनतळांची सोय केली आहे. बेलापूर, वाशी परिसरात वाहनतळांची क्षमता जास्त आहे. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बेलापूर येथील सायकलतळ बंद आहे. दुचाकी वाहनतळाचा वापर बस डेपोसाठी केला जात आहे. काम झाल्यानंतर ते अद्ययावत करण्यात येईल.

मोहन निनावे, सिडको जनसंपर्क अधिकारी