नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला पुरस्कार मिळाला आहे; पण हा पुरस्कार चांगल्या सेवेसाठी मिळालाय की अन्य कोणत्या कारणांसाठी हे मात्र समजू शकलेले नाही. याला कारणही तसेच आहे. नवी मुंबईत बस वेळेवर येत नसल्याच्या प्रवाशांच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घरातून कामासाठी बाहेर पडलेली व्यक्ती कामाने नव्हे तर बसच्या प्रतीक्षेत व्यापून जात असल्याचे निदर्शनास आले आहे.ठाणे-बेलापूर मार्गावर रोज प्रवाशांना एनएमएमटीच्या बसगाडय़ांचा आधार आहे. पण एनएमएमटीला वेळेची तमा नसल्याने थांब्यांवर ताटकळत उभे असलेले प्रवासी खासगी वाहनांना आपलेसे करीत आहेत.
विशेष म्हणजे वातानुकूलित बसगाडय़ांच्या वेळापत्रकात कमालीचा गोंधळ आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरसह कोपरखरणे-पनवेल मार्ग, वाशी-कल्याण-डोंबिवली, वाशी-ऐरोली-मुलुंड या मार्गावर बसच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एनएमएमटीला नेमका कशासाठी पुरस्कार मिळाला आहे, असा सवाल केला आहे. कळवा आणि दिघा परिसरातील प्रवाशांना बससाठी तासभर वाट पाहावी लागत आहे. रस्त्यांच्या कामांमुळे बसगाडय़ा वेळेत येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. मुलुंड आणि ऐरोलीकडे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवांशाना दर २५ मिनिटांनी एक बस उपलब्ध होत आहे. याही पेक्षा विदारक परिस्थिती म्हणजे कल्याण डोंबिवलीकडे जाणाऱ्या प्रवांशाना सकाळ आणि संध्याकाळ कामाचे वेळापत्रक वगळता दुपारच्या सत्रात बस कमी असल्याने इतर परिवहन सेवेचा आधार घ्यावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिकारीही संपर्काबाहेर
परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता बसगाडय़ांचे प्रमाण कमी असल्याचे कारण सांगण्यात आले. तसेच डेपो मधूनच परस्पर गाडीदेखील रद्द करण्यात येत असते, असे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मात्र त्यामुळे परिवहनचा महसूल बुडीत जात असताना आधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे प्रवांशाकडून बोलले जात आहे. अनेकदा डेपोमध्ये बसेसच्या माहितीकरिता प्रवाशांकडून फोन केला जातो. मात्र तिथे असणारे आधिकारी असमाधानकारक उत्तरे देत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. यांसदर्भात परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers complaints against nmmt bus for not coming in time