नवी मुंबई : अंडरपासची सोय असूनही रूळ ओलांडणे नागरिकांचे कमी होत नाही. यात झालेल्या अपघातात बहुतांश लोकांचा मृत्यूच झालेला आहे. मात्र वाशीत नुकताच घडलेल्या एका घटनेत लोकलची धडक बसूनही एकाचा जीव वाचला आहे.  लोकल आणि फलाट यात तो अडकला असताना रेल्वे प्रवासी आणि पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढले गेले. सध्या मुंबईतील रुग्णालयात तो प्रवासी उपचार घेत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई लोकलच्या रुळावर अडकलेल्या माणसाला वाचवण्यासाठी मुंबईकरांनी ढकलला लोकलचा डबा, पाहा Video

वाशी स्टेशन आता मुंबई मधील स्टेशन प्रमाणेच कायम गर्दी असलेले स्टेशन झाले आहे. याच ठिकाणी सोमवारी दुपारी पनवेल ते छ. शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील दोन चाळीसची लोकल  वाशी स्टेशन मध्ये शिरत होती. नेमके याच वेळेस राजेंद्र खांडके हे ४८ वर्षीय गृहस्थ रूळ ओलांडून समोरच्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तेवढ्यात लोकल आल्याने ते माघारी फिरले मात्र त्यांना फलाटावर चढता आले नाही. दुसरीकडे लोकल थांबवणे शक्य नव्हते. त्यामुळे ते लोकल आणि फलाट या पोकळीत अडकले. या स्थितीत लोकल पुढे मागे करणे शक्य नव्हते आणि लोकल उचलून त्या व्यक्तीला काढणे हि शक्य नव्हते.

हेही वाचा >>> नवी मुंबईतील परवाने मुंबईतील फेरीवाल्यांना; अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आरोप

या परिस्थितीत केवळ दोन पाच सेंटीमीटर लोकल आणि त्या व्यक्तीत निर्माण झाले तर त्याला बाहेर काढणे शक्य होणार होते. यावेळी उभे असलेले प्रवासी त्याच्या मदतीला धावले आणि शेकडो हात लोकलला लागले. त्यामुळे लोकल उचलली गेली नाही मात्र एका बाजूचे शॉक ऑब्झर्वर कलते झाले . हीच वेळ साधत पोलिसांनी राजेंद्र यांना बाहेर काढले. त्यावेळी ते गंभीर जखमी होते. त्यांना तात्काळ वाशीतील मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथूनही मुंबईतील जे जे रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी कटारे यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers push local train to save man trapped under wheels at vashi station zws