उरण: शहरातील पेन्शनर्स पार्क येथे रात्रीच्या वेळी उभ्या करण्यात येणाऱ्या एन एम एम टी बसेसचे दरवाजे उघडे राहत असल्याने या बस मध्ये मोकाट श्वान बस मधील असनांवर बसत आहेत. त्यामुळे बस मधील।बाकांवर अस्वच्छता होत आहे. त्याचप्रमाणे पहाटे पाच वाजता मोजके प्रवासी असल्याने या श्वानांपासून प्रवाशांना धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. याची तक्रार एन एम एम टी व्यवस्थापनाकडे करूनही दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एन एम एम टी ची बस सेवा ही उरणच्या प्रवाशांसाठी महत्वाची आहे. उरण शहरातून दररोज पहाटे पाच वाजता नवी मुंबई करीता पहिली बस सोडण्यात येते. त्यामुळे नागरिकांना पुढील प्रवास वेगाने करता येते. त्यासाठी रात्रीच्या वेळी आलेल्या बसेसना दरवाजे नसल्याने ज्या ठिकाणी उभ्या केल्या जातात तेथील भटके श्वानं या बसेस मध्ये मुक्काम करतात.
हेही वाचा… सिडकोला अतिरिक्त पाणी नाही, पैसेही नाहीत; नवी मुंबई महापालिका आयुक्तांची भूमिका
यातील श्वानं ही बस मधील असनांवर बसून अस्वच्छता करीत आहेत. त्यामुळे बस मध्ये बसणे अवघड होत असल्याची तक्रार उरण मधील सामाजिक कार्यकर्ते सुबोध दरणे यांनी केली होती. यासंदर्भात एन एम एम टी चे मुख्य वाहतूक अधिकारी उमाकांत जंगले यांनी ही बस सेवा शहरी असल्याने त्यांना दरवाजे नाहीत. त्याचप्रमाणे काही बसचे दरवाजे नादुरुस्त झाले असण्याची शक्यता आहे. याची दखल घेऊन काळजी घेतली जाईल. असे आश्वासन दिल्यानंतर ही तीच स्थिती आहे.