लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण: पनवेल एसटी बस स्थानकात प्रवाशांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पनवेल हे राज्यातील व रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे एसटी बस स्थानक आहे. त्याचा फटका उरणमधील प्रवाशांना ही बसत आहे. त्याचप्रमाणे या बस स्थानकातून मुंबई, ठाणे, कल्याण, मुंब्रा, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ,अलिबाग, मुरुड, रत्नागिरी, श्रीवर्धन, माणगाव, दिवे आगर, खोपोली, कर्जत, उरण, चिरनेर तसेच निरनिराळ्या भागात एसटीच्या बसने प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांची सतत गर्दी असते. मात्र पनवेल एसटी बस स्थानक नव्याने उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी हे बस स्थानक पाडले असून, ते अजून उभारले गेले नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

प्रवाशांना उभे राहण्यासाठी फलाटे होती त्यातील काही फलाटे पाडण्यात आली असल्यामुळे प्रवाशांना भर उन्हा पावसात बस लागण्याची वाट पहावी लागते. यात चिरनेर परिसराकडे जाणाऱ्या एसटीच्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी केली असल्यामुळे चिरनेरकडे जाणाऱ्या प्रवाशांचे दर दिवशी हाल होत आहेत. चिरनेर मार्गे केळवणे गावाकडे जाणारी संध्याकाळची सहा दहाची बस आणि संध्याकाळच्या इतर गाड्या वेळेवर लागत नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. परिणामी चिरनेर मार्गे आवरे, केळवणे या गावांकडे जाणाऱ्या एसटीच्या गाड्यांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून सातत्याने केली जात आहे. या एसटी बस स्थानकातून अनेक बसच्या फेऱ्या रद्द करणे, नादुरुस्त होणे, अस्वच्छ असणे, वाहक चालक तंत्रज्ञांची कमतरता भासणे, एसटी बसची कमतरता असणे, असे प्रकार सतत घडत आहेत.

आणखी वाचा-नवी मुंबई : मोरबे धरणात मागील १५ दिवसांत फक्त १४१ मिमी पाऊस! यंदा तरी धरण भरणार का?

या बाबतीत प्रवाशांनी पनवेल एसटी आगाराच्या व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारी देखील केल्या आहेत. स्वच्छतागृहे व शौचालये यांची झालेली दुरावस्था यामुळे प्रवाशांबरोबर कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या एसटी बस स्थानकाच्या बाजूला खोदकाम चालू असून, या खोदकामाचा चिखल ज्या ठिकाणी एसटी बस उभ्या केल्या जातात त्या ठिकाणी येत असल्यामुळे प्रवाशांना चिखलातून बस मध्ये चढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे टाळण्यासाठी होत असलेल्या कसरतीत येथे अनेक वेळा गंभीर प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य प्रवाशांत एसटी प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा-उरण : श्रावणात स्थानिक भाजीपाला महाग, नागरिकांमध्ये नाराजी; ६० ते शंभर रुपये किलोने विक्री

पनवेल एसटी बस स्थानकातील वर्तमान स्थितीबाबत संताप जनक प्रतिक्रिया उमटत असून, शहराचा महत्वपूर्ण आसरा असलेल्या या बस स्थानकात पडलेले खड्डे, निवारा शेडची दुरावस्था सार्वजनिक स्वच्छता, शौचालये व मुतारींची झालेली दुरावस्था याकडे बघण्यास येथील अधिकारी व जबाबदार लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers suffer from inconvenience at panvel st bus stand mrj
Show comments